बिलासपूर : शिक्षण किंवा शिस्तीच्या नावाखाली शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे क्रौर्यच असून ते मानवाधिकाराचेही उल्लंघन आहे, असे मत व्यक्त करीत छत्तीसगड उच्च न्यायालयाने शिक्षिकेची याचिका फेटाळली आहे.
सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधील शिक्षिका सिस्टर मर्सी ऊर्फ एलिझाबेथ होजे यांच्यावर सहावीतील एका विद्यार्थिनीला मारहाण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. शिक्षिका होजे यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी मारत होतो, त्यात त्यांना जीवे मारण्याचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला.
मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्या. रवींद्रकुमार अग्रवाल यांच्या खंडपीठाने याचिककर्त्या शिक्षिकेचा युक्तिवाद फेटाळला. न्यायालयाने म्हटले की, घटनेने प्रत्येकालाच सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मुलांना देण्यात येणारी मारण्याची शिक्षा हे या अधिकाराचे उल्लंघन आहे. मुले लहान आहेत म्हणजे त्यांना मोठ्यांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही असे मुळीच समजता कामा नये. लहान मुलांना शिस्त लावण्याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यासाठी मारणे हे क्रौर्यच आहे. वरीलप्रमाणे टिपणी करीत न्यायालयाने एलिझाबेथ होजे यांची याचिका फेटाळून लावली.