

Rishikesh bus accident
ऋषिकेश: उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात बद्रीनाथ महामार्गावर हरिद्वारहून जोशीमठकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला असलेले कठडा तोडून थेट दरीत कोसळली. आज (दि. १७) पहाटे गुलारजवळ झालेल्या या अपघातात किमान सहा जण ठार झाले असून, सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत.
सुमारे ३०-३५ प्रवाशांना घेऊन जाणारी ही 'विश्वनाथ सेवा' बस पुलावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच ब्यासी आणि ढलवाला येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २० जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवले जात आहे. टिहरीच्या जिल्हा दंडाधिकारी नितिका खंडेलवाल आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्वेता चौबे देखील घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये सोमवारी रात्री दुसरा एक मोठा अपघात घडला. रुद्रप्रयागमध्ये बांसवाडा-कंडारा मार्गावर एक बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्यापासून सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बोलेरो गाडीत १० लोक होते. एका लग्न समारंभातून ते आपल्या गावी परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती खोल दरीत कोसळली.