

Azam Khan ED court custody : ईडी न्यायालयात हजर असताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. न्यायालयाने ईडीची कोठडीची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी दासना कारागृहात झाली आहे.
आज ईडीने आझम खान यांना विशेष न्यायाधीश अवनीश कुमार पांडे यांच्यासमोर हजर केले. यावेळी आजम खान यांनी हात जोडले. सूडबुद्धीच्या राजकारणाने सर्व काही संपवून टाकल्याचे ते म्हणाले. कोर्टात हजर करताना, "आता बोलण्यासारखे काही उरलेलेच नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली. गाझियाबाद येथील ईडीच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी पार पडली.
आझम खान यांचे वकील आणि माजी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील महेश यादव यांनी ईडीच्या या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आजम खान यांच्या खात्यात एका रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच, राज्य सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईडीला जर आजम खान यांची चौकशी करायचीच होती, तर बी-वॉरंट काढून आधीच चौकशी करता आली असती, असेही यादव म्हणाले.
ईडी केंद्र आणि राज्य सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप महेश यादव यांनी केला. राजकीय वैमनस्यातूनच ही संपूर्ण कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले. ईडीच्या या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जौहर विद्यापीठाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शनिवारी आझम खान यांना रामपूर तुरुंगाबाहेर ताब्यात घेतले होते. अटकेनंतर आझम खान यांना गाडीत बसवताना समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच मोर्चा सांभाळत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आणि कडक बंदोबस्तात ईडीने आझम खान यांना गाडीत बसवून गाझियाबादच्या दिशेने रवाना झाले होते.