Ayushman Bharat Yojana treatment packages Expanded : आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लोकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने' (AB-PMJAY) अंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या उपचार सुविधांचा विस्तार करत आहे.
केंद्र सरकारतर्फे ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ (AB-PMJAY) अंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उपचारांच्या सुविधांचा दायरा आणखी वाढवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत राखीव उपचारांच्या पॅकेजची संख्या २३ वरून थेट ११२ पर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. यामुळे या योजनेचे लाभार्थी आता सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचार घेऊ शकतील.
'पीटीआय'च्या वृत्तानुसार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (NHA) अधिकारी सूत्रांनी सांगितले की, या प्रस्तावित विस्तारामध्ये प्रामुख्याने अशा सामान्य आजारांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या आजारांवर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये, विशेषतः समुदाय आरोग्य केंद्र (CHC) आणि उप-जिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतात. या बदलामुळे उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे किंवा खासगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागणार्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यातील अनेक उपचार सरकारी रुग्णालयांमध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने करणे शक्य आहे."आमचा उद्देश हा सुनिश्चित करणे आहे की, रुग्णांना अशा उपचारांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये. त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. तसेच, या रुग्णालयांचा वापर वाढल्यामुळे तेथील पायाभूत सुविधा बळकट होण्यास आणि सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल," असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सूत्रांनुसार, या नव्या प्रस्तावामध्ये ८९ नवीन उपचारांच्या पॅकेजेसचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनेक सामान्य आजार आणि लहान-मोठ्या शस्त्रक्रियेचा समावेश असून, आता यावर समुदाय आरोग्य केंद्र (CHC) आणि उप-जिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) देखील उपचार होऊ शकतील.
प्रस्तावित यादीमध्ये अशा अनेक आजारांचा समावेश आहे, ज्यांचा सामना सर्वसामान्यांना वारंवार करावा लागतो. यात प्रामुख्याने अशक्तपणा (अॅनिमिया), उच्च रक्तदाब, ब्राँकायटिस, अतिसार, हगवण (डिसेंट्री), पोट आणि आतड्यांची जळजळ, लघवीचा संसर्ग (यूरिन इन्फेक्शन) आणि मुतखड्यामुळे (किडनी स्टोन) होणाऱ्या तीव्र वेदनांवरील उपचारांचा समावेश आहे.याशिवाय, अचानक येणारा ताप आणि मधुमेहाच्या (डायबेटीस) काही गुंतागुंतीच्या स्थितीवरील उपचारांचाही यामध्ये प्रस्ताव आहे. शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रियेबाबत बोलायचे झाल्यास, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्टेरेक्टॉमी), पिवसी (पाइल्स), हायड्रोसील, गाठी आणि चरबीच्या गाठींवर (लिपोमा) उपचार यात समाविष्ट आहेत. तसेच, बायोप्सी अर्थात निदानासाठी शरीराच्या ऊतींचे नमुने घेण्याची प्रक्रिया देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. डोळ्यांच्या समस्यांमध्ये डायबिटिक रेटिनोपॅथी आणि काचबिंदू (ग्लूकोमा) तपासणीचाही या प्रस्तावित यादीत समावेश आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार पुरवल्याबदल्यात सरकारी रुग्णालयांना खर्चाची प्रतिपूर्ती (रिमंबर्समेंट) केली जाते. या मिळणाऱ्या निधीचा वापर पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी, औषधे व उपचारासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आणि अतिरिक्त आरोग्य तज्ज्ञांच्या सेवा घेण्यासाठी केला जाऊ शकतो.