

पुणे: आयुष्मान भारत-महात्मा फुले योजनेचा लाभ घेताना नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कागदपत्रांची कमतरता, तर कधी कार्ड असूनही कॅशलेस उपचार नाकारले जातात. त्यामुळे आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी कार्ड नाकारल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजनेचा एकत्रित लाभ मिळावा, यासाठी उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. त्याचप्रमाणे उपचारांची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आयुष्मान भारत कार्डवर भर दिला जात आहे.
लाभार्थ्यांना समाविष्ट रुग्णालयांत ‘आरोग्य मित्र’ काऊंटरवर आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. उपचार प्रक्रियेत अडचणी आल्यास लाभार्थ्यांनी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. टोल-फ्री क्रमांकही कार्यरत आहे.
‘आरोग्य मित्र’ काऊंटरवर संपर्क क्रमांक उपलब्ध
अडचणींसाठी टोल-फ्री हेल्पलाइन
25 टक्के बेड लाभार्थ्यांसाठी राखीव
कार्ड नाकारल्यास तक्रार नोंदवा
नागरिकांनी योजनेत समाविष्ट (एम्पॅनेल्ड) रुग्णालयांचीच निवड करावी
उपचारापूर्वी कॅशलेस सुविधेबाबत खात्री करून घ्यावी
कार्ड व कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक
योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड असल्यास उपचारांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होते, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे. योजनेअंतर्गत सहभागी रुग्णालयांनी किमान 25 टक्के बेड लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवणे अपेक्षित आहे. दरम्यान, आशा कार्यकर्त्यांमार्फत नागरिकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविण्याचे काम सुरू आहे. पात्र नागरिकांनी अद्याप कार्ड काढले नसल्यास ते त्वरित नोंदणी करून घ्यावी.
डॉ. वैभव गायकवाड, समन्वयक, पुणे जिल्हा