Ayodhya Ram Lalla Darshan new Schedule : अयोध्येत १ नोव्हेंबरपासून प्रभू श्रीरामललांच्या दर्शनाची वेळ बदलली; पहा नवे वेळापत्रक!

ऋतुबदलाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचा निर्णय; रात्री १० वाजता बंद होणार मंदिराचे मुख्य दरवाजे
Ayodhya Ram Lalla Darshan new Schedule : अयोध्येत १ नोव्हेंबरपासून प्रभू श्रीरामललांच्या दर्शनाची वेळ बदलली; पहा नवे वेळापत्रक!
Published on: 
Updated on: 

अयोध्या : ऋतुबदलामुळे हिवाळ्याची चाहूल लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील भव्य श्रीरामजन्मभूमी मंदिरात विराजमान प्रभू श्रीरामलला यांच्या दैनंदिन पूजा, आरती, नैवेद्य (भोग), विश्रांती आणि भाविकांच्या दर्शन वेळापत्रकात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. मंदिरातील ही नवीन दिनचर्या रविवार, १ नोव्हेंबर २०२६ पासून अधिकृतपणे लागू होणार आहे.

सध्याच्या नियमांनुसार मंदिराचे दरवाजे पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी उघडले जातात आणि रात्री १०:३० वाजता बंद केले जातात. मात्र, १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या सुधारित वेळापत्रकानुसार मंदिराचे दरवाजे पहाटे ४ वाजता उघडले जातील, तर रात्री १० वाजताच बंद केले जाणार आहेत.

सकाळची दिनचर्या आणि दर्शन

सुधारित नियमांनुसार, पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ४:३० ते ४:४० या वेळेत मंगला आरती संपन्न होईल. यानंतर पहाटे ४:४० ते ६:३० या कालावधीत प्रभू श्रीरामलला यांचा अभिषेक, शृंगार, धूप-दीप आणि नैवेद्यासाठी गर्भगृहाचे दरवाजे बंद राहतील. सकाळी ६:३० वाजता शृंगार आरती पार पडेल आणि सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांसाठी प्रत्यक्ष दर्शन सुरू होईल.

त्यानंतर सकाळी ८:०० ते ८:१० या वेळेत प्रभूंच्या बालभोगासाठी थोडा वेळ दर्शन बंद राहील. बालभोगानंतर सकाळी ११:३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल. सकाळी ११:३० ते दुपारी १२ या वेळेत राजभोग अर्पण केला जाईल आणि बरोबर दुपारी १२ वाजता राजभोग आरती संपन्न होईल. दुपारी १२:३० ते १:३० या एका तासाच्या कालावधीत प्रभू श्रीरामलला विश्रांती घेतील, त्यामुळे या काळात मंदिर दर्शनासाठी बंद असेल. दुपारी १:३० वाजता पुजाऱ्यांचा प्रवेश आणि अल्पभोगानंतर दुपारी १:३५ वाजल्यापासून पुन्हा भाविकांसाठी दर्शन खुले केले जाईल.

संध्याकाळचे वेळापत्रक आणि शयन आरती

दुपारनंतर सायंकाळी ४:०० ते ४:१० या वेळेत बालभोगासाठी दर्शन तात्पुरते थांबवले जाईल. त्यानंतर सायंकाळी ६:४५ वाजेपर्यंत दर्शन अखंड सुरू राहील. सायंकाळी ६:४५ ते ७:०० या वेळेत धूप-दीप व नैवेद्य समर्पण झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता संध्या आरती होईल.

रात्रीच्या सत्रात ८:०० ते ८:३० आणि ९:१५ ते ९:३० या वेळेत प्रभूंच्या धूप-दीप व नैवेद्यासाठी दरवाजे बंद राहतील, तर उर्वरित वेळेत भाविकांना नियमित दर्शन घेता येईल. अखेर रात्री ९:३० वाजता प्रभूंची शयन आरती केली जाईल आणि रात्री १० वाजता मंदिराचे सर्व दरवाजे बंद केले जातील.

अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी १ नोव्हेंबरपासून या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊनच आपल्या दर्शनाचे आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

श्रीरामलला यांच्या दर्शनाची व आरत्यांची सुधारित वेळ (१ नोव्हेंबर २०२६ पासून)

  • पहाटे ४:०० — मंदिराचे दरवाजे उघडणार

  • पहाटे ४:३० ते ४:४० — मंगला आरती

  • सकाळी ६:३० — शृंगार आरती

  • सकाळी ७:०० — भाविकांसाठी दर्शनास प्रारंभ

  • सकाळी ८:०० ते ८:१० — बालभोग (दर्शन बंद)

  • दुपारी १२:०० — राजभोग आरती

  • दुपारी १२:३० ते १:३० — विश्रांती (मंदिर बंद)

  • दुपारी १:३५ — दुपारनंतर दर्शन सुरू

  • सायंकाळी ४:०० ते ४:१० — बालभोग (दर्शन बंद)

  • सायंकाळी ७:०० — संध्या आरती

  • रात्री ९:३० — शयन आरती

  • रात्री १०:०० — मंदिर पूर्णपणे बंद होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news