

अॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी एका महत्त्वाच्या संशोधन मोहिमेला सुरुवात केली आहे. अॅक्सिओम स्पेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, शुभांशू शुक्ला यांनी आयएसएसमधील आपला तिसरा दिवस सूक्ष्म-शैवालावरील (micro-algae) प्रयोगात व्यतित केला. अशा प्रकारचे प्रयोग करणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.
शुभांशू शुक्ला यांनी पहिल्या प्रयाोगात अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्गाचा खाद्य सूक्ष्म शैवालांवर होणारा परिणाम अभ्यासला. हा प्रयोग इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे. सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात खाद्य सूक्ष्म-शैवालाच्या तीन निवडक प्रकारांची वाढ आणि त्यांच्या चयापचयावर होणाऱ्या परिणामांवर यावर संशोधन केले जात आहे. अंतराळ प्रवासातील परिस्थितीमुळे मानवी स्नायूंच्या विकासात आणि कार्यप्रणालीत अडथळा कसा येतो, याचा उलगडा करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान, या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष भविष्यात नवीन उपचारात्मक धोरणे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी म्हटले होते. शुभांशू शुक्ला अंतराळात भारतासाठी ७ विशेष प्रयोग करणार आहेत.
अॅक्स-४ मोहिमेतील क्रू सदस्य कमांडर पेगी व्हिटसन यांनी अंतराळ स्थानकावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये कर्करोगाच्या तपासणीचे काम सुरू ठेवल आहे. यामुळे सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणात कर्करोगाच्या वर्तनाबद्दल नवीन माहिती मिळणार आहे. अंतराळवीरांनी 'न्यूरो मोशन व्हीआर' प्रकल्पासाठीही डेटा गोळा केला आहे. ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस हेडसेटचा वापर करून अंतराळवीरांच्या मेंदूच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या संशोधनातून भविष्यात विचारांनी नियंत्रित होणाऱ्या अंतराळयान प्रणालीची शक्यता तपासली जात आहे. तसेच, पक्षाघात (stroke) झालेल्या किंवा मर्यादित हालचाल असलेल्या व्यक्तींसाठी न्यूरो-रिहॅबिलिटेशन उपचारांमध्येही याची मदत होऊ शकते.