नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी (दि.6) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्लीस्थित काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या भारतीय रेल्वेच्या पदांचा राजीनामा दिला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कुस्तीपटु विनेश फोगाट विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेश फोगाट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस निवडणूक समितीची बैठक झाली. आतापर्यंत एकूण 71 जागांवर निर्णय घेण्यात आले आहेत. बजरंग पुनिया निवडणूक लढवणार नाही. मात्र आता तो निवडणूक लढवणार नसून केवळ प्रचार करणार असल्याची परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर विनेश फोगाट म्हणाली की, भाजप ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देत आहे, तर काँग्रेसने कुस्तीपटूंना दिल्लीत तेव्हा पाठिंबा दिला होता. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी देशातील जनता आणि मीडियाचे आभार मानते, माझ्या कुस्तीच्या प्रवासात तुम्ही मला साथ दिली. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो, कठीण काळात तुमच्यासोबत कोण आहे हे सांगतो. आम्हाला रस्त्यावर ओढले गेले तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्या पाठीशी उभे राहिले. मी एक नवीन इनिंग सुरू करत आहे, मला वाटते की खेळाडूंना आम्हाला जे सहन करावे लागले ते सहन करावे लागणार नाही. आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. आमची कोर्ट केस सुरू आहे, तिही आम्ही जिंकू.