पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी आता राजकीय आखाड्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी आज (दि.६ सप्टेंबर) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया हे देखील उपस्थित होते.
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर विनेश फोगाट म्हणाल्या, "लढा सुरूच आहे, तो अजून संपलेला नाही. तो कोर्टात आहे. आम्ही तो लढाही जिंकू... आज जे नवीन व्यासपीठ मिळत आहे, त्यासोबत आम्ही काम करू. देशाच्या सेवेसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी आमचे सर्वोत्तम कार्य करू, जर तुमच्यासाठी कोणी नसेल तर मी तिथे असेल, काँग्रेस पक्ष असेल, असेही त्या काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर म्हणाल्या.
कुस्तीपटू बजरंग पुनिया (Wrestlers Bajrang Punia) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी बुधवारी (दि.४ सप्टें) काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान बजरंग आणि विनेश यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याने दोघांना काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. त्यानंतर आज (दि.६) या दोघांनीही काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम १ दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासोबत हरियाणामध्ये १ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते आणि ४ ऑक्टोंबर रोजी दोन्ही राज्यांतील निकाल जाहीर होणार होता. मात्र, हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर येथील निकाल जाहीर होणार आहे.
विनेशने नुकतीच शंभू आणि खनौरी सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. यावेळी विनेशला तू निवडणूक लढवणार का? असा सवाल केला होता. त्यावर तिने उत्तर दिले की, तिला राजकारण कळत नाही. पण शेतकऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट जेव्हा मायदेशी परतली तेव्हा दिल्ली विमानतळावर तिचे हरियाणा काँग्रेस नेते दीपेंद्र सिंग हुड्डा यांनी तिचे स्वागत केले होते. यानंतर ते काढलेल्या रोड शोवळी फोगाट बरोबर होते. दिल्ली विमानतळावरून बलाली येथे पोहोचेपर्यंत विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत दीपेंद्र सिंग हुडा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते होते.