Apple India manufacturing
दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भारतात आयफोन न बनवण्याचे आवाहन केले आहे. भारताऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावे, असा सल्ला त्यांनी कुक यांना दिला. अॅपल भारतात आपली उत्पादन क्षमता वेगाने वाढवत असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर अॅपल खरचं भारतात आयफोन बनवणे बंद करणार का? याबद्दल अॅपलचे अधिकारी काय म्हणतात? जाणून घ्या...
दोहा येथील एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प आणि ॲपलचे सीईओ टिम कुक यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प कुक यांना म्हणाले की, तुम्ही माझे मित्र आहात. पण आता मी ऐकले आहे की तुम्ही भारतात कंपनीचे बांधकाम करत आहात. पण भारत हा सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तुम्ही भारतात कंपनीचे बांधकाम करू नका, असे ते म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय बाजारपेठेसाठी असलेले आयफोन भारतात बनवले जाऊ शकतात, परंतु अमेरिकन ग्राहकांसाठी असलेले आयफोन नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Apple चा भारतातील उत्पादन विस्तार आणि गुंतवणूक योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ट्रम्प आणि टिम कुक यांच्यातील बैठकीनंतर, अॅपलच्या अधिकाऱ्यांनी भारत सरकारला आश्वासन दिले आहे की ते त्यांच्या गुंतवणूक धोरणांवर काम सुरू ठेवतील. ट्रम्प यांनी टिम कुकला स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना अॅपलने भारतात उत्पादन करावे असे वाटत नाही. यासोबतच त्यांनी असेही म्हटले की भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ट्रम्प यांच्या या विधानामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर आणि अॅपलच्या मेक इन इंडिया धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भारतात अॅपलचे उत्पादन थांबवण्यासोबतच, ट्रम्प यांनी असा दावाही केला की भारत सरकार अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क हटवण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात उत्पादन करण्याची गरज कमी होते. परंतु भारत सरकारने अशा कोणत्याही दाव्याची पुष्टी केलेली नाही.
सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतात गुंतवणूक करण्याची अॅपलची योजना तशीच राहील. अॅपल भारताला त्यांच्या जागतिक पुरवठा साखळीसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पाहते. २०२४ मध्ये, अॅपलने भारतात सुमारे ४ ते ४.५ कोटी आयफोन तयार केले. हे प्रमाण जागतिक उत्पादनाच्या अंदाजे १८ ते २० टक्के आहे. याशिवाय, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, मार्च २०२५ पर्यंत भारतात २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन तयार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ६० टक्के जास्त आहे. एवढेच नाही तर, अॅपलने आधीच स्पष्ट केले आहे की, अमेरिकेत वापरले जाणारे आयफोन भारतातच बनवावेत अशी त्यांची इच्छा आहे. ते याला मेक इन इंडियाचा क्षण म्हणून पाहतात. या उपक्रमांतर्गत, अॅपलने भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या आयफोनचा मोठा भाग अमेरिकेत पाठवला जातो. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, भारत २०२६ पर्यंत दरवर्षी ६ कोटींहून अधिक आयफोन तयार करू शकेल, जे सध्याच्या क्षमतेच्या दुप्पट असेल.