

Andhra Pradesh Waterfall Girls Drown
विशाखापट्टणम: सहलीचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर गेलेल्या चार मैत्रिणींच्या आयुष्यातील हा क्षण अखेरचा ठरला. आंध्रप्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने तीन अल्पवयीन तरुणींचा मृत्यू झाला. विशाखापट्टणमजवळील अनंतगिरी टेकड्यांमधील मुलगुम्मी धबधब्यावर गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली.
एस. त्रिशा (वय १७), एस. रत्नकुमारी (वय १६) आणि एस. पवित्रा (वय १५) अशी मृत मुलींची आहेत. तर कढड्यावरून फोटो काढत असलेली जखमी मुलगी, एस. अंजली (वय १६), हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चौघीही एकमेकींच्या नातेवाईक आणि हुकुंपेटा ताल्याक्यातील जंबुवलासा गावाच्या रहिवासी होत्या.
धबधब्याच्या काठावरील पाण्यात उभ्या असलेल्या इतर तीन मुलींचे अंजली फोटो काढत असतानाच, त्यांचा तोल गेला; त्या पाण्यात पडल्या आणि बुडाल्या. अंजलीने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी ती स्वतःही पाण्यात उतरली, परंतु ती देखील बुडू लागली. मुलींचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले, मात्र त्यांना केवळ अंजलीलाच वाचवता आले. मृत तिन्ही मुली जवळच्याच एका सरकारी शाळेतील विद्यार्थिनी होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि तिन्ही तरुणींचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.