Youth murder case | मोह मित्राच्या मेहुणीचा!

Youth murder case |
Youth murder case | मोह मित्राच्या मेहुणीचा!
Published on
Updated on

डी. एच. पाटील, म्हाकवे

यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडल्याने अद्यापही ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत. जनावरांना अद्यापही माळरानावर व जंगल परिसरात ओला चारा उपलब्ध असल्याने अनेक गुराखी जनावरे चारण्यासाठी जात आहेत. देवचंद कॉलेजजवळील पाठीमागील बाजूस असणार्‍या पाझर तलावाच्या मागे येथे जवळच्या गावातील गुराखी जनावरे चारण्यासाठी येतात. आज रामू गुराखीही लवकरच जनावरे चारण्यासाठी आला होता. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने तो थोडासा कोवळ्या किरणामध्ये जनावरे घेऊन आला होता. थंडी वाजत असतानाही सूर्याची किरणे अंगावर घेत तो जनावरे राखत होता. सोबत असलेल्या मोबाईलमध्ये तो भक्तिगीतांचा आस्वाद घेत होता, ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर’ या अभंगात तो तल्लीन झाला होता.

सूर्याची कोवळी किरणे दवबिंदूवर पडल्यामुळे ती चमकत होती. जनावरांच्या तोंडातून निघणार्‍या वाफा त्या दवबिंदूंना गिळंकृत करत होत्या. माळावर असणार्‍या लाजाळूची पाने जनावरांच्या वाफेने मिटून जात होती. अशातच या रामूच्या म्हशी ओढ्याच्या काठावर आल्या. गारव्यामुळे पाण्यातून वाफा निघत होत्या. म्हशी पुढे जाताच रामूही पुढे गेला आणि त्याला धक्का बसला. ओढ्याच्या पाण्यामध्ये एक तरुण पालथा पडला होता. रामू घाबरला, त्याने धावतपळत गावात जाऊन पोलिस पाटील यांना खबर दिली. संबंधित गावच्या पोलिस पाटलांनी लागलीच मुरगूड पोलिस ठाण्याला बातमी कळवली. घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. एक विशीतला युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटावर चाकूचे वार केलेले दिसत होते, मानेवर वार दिसत होते. पोलिसांनी जागेवरच पंचनामा केला व पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. संबंधित तरुण कोण, कुठला याबाबत देवचंद कॉलेज परिसर, निपाणी परिसरात पोलिसांनी चौकशी सुरू केली. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यातच मृतदेहाच्या अंगावर ऑईलचा साधारणत: वास येत होता. त्यामुळे मिस्त्री काम करणारा संबंधित युवक असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. दुसर्‍या दिवशी इचलकरंजी येथे पोलिस ठाण्याला एक युवक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. संबंधित वर्णन व मुरगूड पोलिसांना सापडलेल्या मृतदेह यामध्ये साम्य जुळत असल्याने लागलीच त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा इचलकरंजी पोलिसांना वर्ग केला आणि पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली.

मृत युवक एका गॅरेजमध्ये काम करत होता. तो दिवसभर गॅरेजमध्ये काम करून संध्याकाळी घरी जात होता. त्याचा कोणाशी भांडण-तंटा आहे का, याबाबत चौकशी सुरू केली. चौकशी सुरू असताना त्याच्या दोन मित्रांची नावे समोर आली. पोलिसांनी दोघांना उचलले, त्यांना चांगलाच पाहुणचार दिला. परंतु, ते पुन्हा कबूल करायला तयार नव्हते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मृत तरुणाच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यावरून पोलिसांनी दोन तरुण व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्यांना चांगलाच पाहुणचार दिला; मग मात्र त्यांनी तोंड उघडले, आपणच खून केला असल्याचे त्यांनी सांगितले. मृत तरुण व मारेकरी तिघेही मित्र होते. यामधील एका आरोपीच्या मेहुणीशी मयत तरुणाचे प्रेमसंबंध होते. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. मृत तरुणाला संबंधित आरोपींनी मारहाण केली होती. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असताना एक अल्पवयीन मुलगा यामध्ये सामील असल्याचे आढळून आले.

मृत तरुणाला आरोपींनी बराच वेळा आपल्या मेहुणीचा नाद सोड म्हणून मारहाण केली होती. परंतु, एवढे होऊनही मृत तरुण व मेहुणी यांच्या गाठीभेटी सुरूच होत्या. त्यामुळे दाजीला राग आला, दाजीने आपल्या मित्राला सामील करून घेऊन त्या दिवशी एकाची गाडी कागलजवळ बंद पडली आहे, असे सांगून मृत तरुणाला गाडीवर घेतले. त्याला गाडीवर घेऊन निपाणीच्या जवळ देवचंद कॉलेजच्या माळावर त्यांनी आणले. तिथे तिघांनी दारू प्राशन केली. दारू चढल्यानंतर मेहुणीवरून पुन्हा वाद उफाळून आला. यातील दाजीने जवळ असलेला कोयता काढला व कोयत्याने सपासप वार केले. घाव वर्मी बसल्याने तरुण मृत्युमुखी पडला. आपले काम झाले म्हणून आरोपी मृतदेह ओढ्यामध्ये टाकून पसार झाले. काही घडलेच नाही अशा आविर्भावात ते दोन दिवस वावरत होते; परंतु पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे तपास करून तीनही आरोपींना अटक केली आहे. सध्या आरोपी जेलमध्ये आहेत. मेहुणीशी जवळीकता मृत तरुणाला चांगलीच महागात पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news