

Sarnath UNESCO World Heritage Site : भगवान बुद्धांची प्रथम धम्मदेसना (पहिले उपदेश) भूमी असलेल्या सारनाथचा अखेर युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage Sites) यादीत समावेश करण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या अधिवेशनात शनिवारी ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या मान्यतेमुळे सारनाथ हे भारतातील ४५ वे आणि उत्तर प्रदेशातील चौथे युनेस्को जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.
सारनाथचा ३ जुलै १९९८ रोजी युनेस्कोच्या संभाव्य (टेंटेटिव्ह) यादीत समावेश करण्यात आला होता. दीर्घकाळ चाललेल्या प्रक्रियेनंतर आता या स्थळाला अधिकृतपणे जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फत्तेपूर सिक्री ही स्थळेच युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होती. आता सारनाथच्या समावेशामुळे उत्तर प्रदेशच्या जागतिक वारशाची ओळख पहिल्यांदाच पूर्वांचल भागापर्यंत पोहोचली आहे.
युनेस्कोने मान्यता दिलेल्या या क्षेत्रात चौखंडी स्तूप आणि सारनाथच्या पुरातत्व परिसराचा समावेश आहे. चौखंडी स्तूप ही ती जागा मानली जाते, भगवान बुद्धांची त्यांच्या पहिल्या पाच शिष्यांशी भेट झाली होती. तर पुरातत्व परिसरात धमेख स्तूप, धर्मराजिका स्तूप, प्राचीन विहारांचे अवशेष आणि सम्राट अशोकाचा प्रसिद्ध स्तंभ यांचा समावेश आहे. ही सर्व स्मारके सारनाथचे बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र म्हणून झालेल्या ऐतिहासिक विकासाची साक्ष देतात.
बौद्ध धर्मामध्ये सारनाथचे विशेष महत्त्व आहे. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी येथेच आपला पहिला उपदेश देऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले होते. याच ठिकाणाहून बौद्ध संघाची स्थापना झाली आणि करुणा, शांती तसेच मध्यम मार्गाचा संदेश जगभरात पसरला. गेल्या सुमारे २६०० वर्षांपासून हे स्थळ बौद्ध अनुयायी आणि तीर्थयाटकांच्या आस्थेचे मुख्य केंद्र राहिले आहे.
"उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक वारशासाठी ही एक ऐतिहासिक उपलब्धी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली वारसा स्थळांचे संरक्षण व विकास करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. या मान्यतेमुळे उत्तर प्रदेशच्या 'बौद्ध सर्किट'ला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल आणि राज्याचा शांती व अध्यात्माचा संदेश जगापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे पर्यटन व संस्कृती मंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.