

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय संस्कृतीत मानाचे पान असणार्या दीपोत्सव अर्थात दिवाळी या सणाचे नाव आता ‘युनेस्को’च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ‘युनेस्को’च्या आंतरसरकारी समितीच्या 22 व्या सत्रात येथे आयोजित केलेल्या बैठकीत यासंदर्भात बुधवारी (दि. 10) घोषणा करण्यात आली.
या ऐतिहासिक घटनेबद्दल ‘युनेस्को’ने त्यांच्या पोस्टमध्ये, ‘अमूर्त वारसा यादीत नवा समावेश : दीपावली, भारत. अभिनंदन!’ असे म्हटले आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या निर्णयाला ऐतिहासिक आणि अभिमानास्पद म्हटले आहे. दिवाळी हा केवळ एक उत्सव नाही, तर ती एक भावना आहे, अनुभव आहे आणि सनातन तत्त्वज्ञान आहे... हा सण म्हणजे नैराश्यावर आशेचा, अधर्मावर धर्माचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव आहे, असे ते म्हणाले.
परंपरा जपणार्यांचा सन्मान
मंत्री शेखावत यांनी पुढे नमूद केले की, हा सन्मान त्या सर्व लोकांचा आहे जे ही परंपरा जिवंत ठेवतात. दिवा बनवणारे कुंभार, कारागीर, मिठाई बनवणारे, शेतकरी, पुजारी हे सर्वजण या जिवंत परंपरेला उत्साही ठेवतात!
देशातील 15 घटक
भारतातील आतापर्यंत 15 घटक या यादीत समाविष्ट आहेत, त्यात दुर्गापूजा, गरबा, कुंभमेळा आणि योग यांचा समावेश आहे. या यादीत दिवाळीचा समावेश होणे, हे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मते, या बैठकीच्या यजमानपदाने भारताला अनेक धोरणात्मक आणि राजनैतिक फायदे मिळतील. यामुळे सांस्कृतिक मुत्सद्देगिरीत भारताचा जागतिक प्रभाव वाढेल आणि विविध वारशांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल.
भारताला ग्लोबल लीडर म्हणून स्थापित करण्याची संधी
यंदा प्रथमच भारत या आंतरसरकारी समितीच्या सत्राचे आयोजन करत आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात हे सहा दिवसांचे महत्त्वपूर्ण आयोजन होत आहे. 180 हून अधिक देशांमधील सुमारे एक हजार प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत.