

Buddha Idols Found In Bihar
पुढारी ऑनलाईन डेस्क
बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील कबैया थाना येथे एका खासगी जमिनीची खुदाई करताना दोन मुर्ती सापडल्या आहेत. जेसीबीने खोदताना या दिसून आल्या. यामध्ये एक मूर्ती ही भगवान गाैतम बुद्धांच्या दोन मूती सापडल्या आहेत. पण काही लोकांना या मूर्ती भगवान विष्णू यांच्या असाव्यात असे वाटते आहे. या जमिनीचे मालक विनायक कुमार यांनी सांगितले की ते आपल्या जमीनीतील माती खोदत होते. त्यावेळी या मूर्ती समोर आल्या. त्यांनी याची खबर तत्काळ पोलिसांना दिली. दरम्यान या मूर्ती मौल्यवान असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
बिहारमध्ये ज्याठिकाणी या मूर्ती सापडल्या आहेत तो भूभाग लाली पहाडीच्या बाजूलाच आहे. या प्रदेशाला ऐतिहासिक महत्व आहे. जर या क्षेत्रामध्ये अजून संधोधन केले तर अजून काही प्राचीन आणि बहुमूल्य मूर्तींना मिळू शकतील. दरम्यान लखीसरायमध्ये मिळालेल्या या दोन्ही मूर्ती मध्ये भगवान विष्णूंच्या हातात जी आयुधे असतात ती मात्र या मूर्तीमध्ये दिसत नाहीत.
उत्खननादरम्यान सापडलेल्या या दोन दुर्मिळ बुद्ध मूर्ती हे पुरावे आहेत की प्राचीन काळात हा परिसर बौद्ध धर्माचे एक समृद्ध केंद्र होता. या दोन्ही मूर्ती ‘धर्मचक्र प्रवर्तन’ मुद्रेतील बुद्धाचे भाव दर्शवतात. प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचे संशोधक डॉ. अंकित जयस्वाल म्हणतात की, ही तीच मुद्रा आहे ज्यामध्ये बुद्धांनी त्यांच्या पहिल्या प्रवचनाच्या वेळी दोन्ही हात फिरवून 'धर्मचक्र' गतिमान केले होते, ही घटना सारनाथमध्ये घडली आणि बौद्ध धर्मात ती खूप महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या मते, लखीसराय येथून सापडलेल्या दोन्ही मूर्ती बौद्ध धर्माच्या आहेत आणि त्यामध्ये बोधिसत्वाची वैशिष्ट्ये आहेत. काही लोक असा दावा करत आहेत की ही मूर्ती विष्णूची आहे परंतु त्या मूर्तीमध्ये विष्णूशी संबंधित कोणतेही वैशिष्ट्य नाही.
मूर्ती अभ्यासकांच्या मते या मूर्ती पाल कालीन असाव्यात. कारण पाल काळातील शिल्पात मऊ बेसाल्ट दगडाचा वापर केला जात असे. बेसाल्ट दगड उत्तम सजावट आणि अलंकार असलेल्या मूर्ती बनवण्यासाठी उपयुक्त होते. गुप्त काळातील शिल्पे त्यांच्या साधेपणा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती, तर पाल काळातील तंत्राने समृद्ध होती ज्यामुळे बुद्ध मूर्तींमध्ये नैसर्गिक सौंदर्याचा अभाव होता. तसेच या मूर्तींच्या पायावर बारीक कोरीवकाम दिसते. शिल्पाची जटिल रचना, फुलांची सजावट, ही सर्व वैशिष्ट्ये पाल काळातील आहेत, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.
दरम्यान मध्य-पूर्व भारतात ८ व्या ते १२ व्या शतकापर्यंतच्या काळाला पाल काळ म्हटले जाते. त्याची व्याप्ती विशेषतः बिहार आणि बंगालपर्यंत विस्तारली होती. लखीसराय जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर नजर टाकली तर असे दिसून येते की हा परिसर बौद्ध शिक्षण, ध्यान आणि स्थापत्यकलेचे केंद्र राहिला आहे. याआधीही जिल्ह्यातील इतर भागात उत्खननादरम्यान बौद्ध काळातील अवशेष सापडले आहेत.