पुणे: चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे काम सुरू आहे. या जुन्या तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि भग्नावस्थेतील शेकडो वर्षे जुन्या काही पुरातन मूर्ती मिळून आल्या आहेत. या अत्यंत पुरातन मूर्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. पुरातत्व विभागाकडून याची तपासणी सुरू आहे.
पुणे-नाशिक मार्गावर असलेला चाकणचा संग्रामदुर्ग भुईकोट किल्ला हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे शिवचरित्रात प्रसिध्द आहे. याच संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्यामुळे प्राचीन व देदीप्यमान इतिहास चाकणला लाभला आहे. त्यामुळे येथे सापडणार्या या अवशेषांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या किल्ल्यात आता काही विरगळ सापडले आहेत.
प्राचीन काळातील अज्ञात वीरांच्या कहाण्या सांगणारे हे विरगळ आहेत. युद्धात आणि रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत अभिमानाचे लक्षण मानले जाते. रणांगणावर मरण आलेल्या वीराचे स्मारक प्राचीन काळी वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारली गेली आहेत. आता अशी अनेक वीरगळ चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीमधून बाहेर येत आहेत. हे विरागळ भलेही फारसे कलात्मक नाहीत.
मात्र, त्या निर्जीव दगडाला स्वत:चा जिताजागता इतिहास आहे. चाकणच्या किल्ल्यात नव्याने मिळून आलेल्या एका वीरगळावर महिला वाघाशी झुंज देत असल्याचे दिसून येत आहे. इतिहासाची साक्ष देणार्या प्राचीन वस्तू, मूर्ती, दुर्ग, किल्ले प्रत्येकासाठी प्रेरणादायक व उमेद जागविणारे आहेत. त्यांचे जतन करणे, हे सर्वांचेच आद्यकर्तव्य असून, त्यांना दुर्लक्षुन चालणार नाही. चाकण भागात सापडणार्या अतिप्राचीन वस्तूंवरून या भागाचा भौगोलिक, ऐतिहासिक व धार्मिक स्थितीचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
चाकण संग्रामदुर्ग परिसरात आणि लगतच्या भागात अशा अनेक मूर्ती आहेत, त्या सर्वांचे एकत्रीकरण करून संग्रहालय उभारले पाहिजे. त्यामुळे अभ्यासकांना संशोधन सोयीचे होईल. शासनाने याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.
यापूर्वीदेखील आढळल्या प्राचीन वस्तू
चाकणजवळ आगरवाडी येथे 2013 मध्ये इतिहासकालीन 8 किलो 23 ग्रॅम वजनाची चांदीची नाणी आढळली होती. त्यावरील काळाचा उल्लेख इसवी सन 255-277 या काळातील व या नाण्यांवर क्षत्रप राजा यशोदामन व रूद्रसेन (दुसरा) यांची मुद्रा असल्याचे स्पष्ट झाले होते. पुरातत्व विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर ही नाणी दुसर्या शतकातील असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे चाकणचा संबंध थेट इ.स. पूर्व दुसर्या शतकाशी जोडला गेला.
तत्पूर्वी येथे अतिप्राचीन यज्ञवराहाची मूर्ती आणि एका मूर्तीचे भग्न शिल्पही सापडले होते. दीड फूट उंच आणि दोन फूट लांबीच्या या वराहाच्या मूर्तींच्या चारही मांड्यांवर प्रत्येकी एक देवता कोरलेली आढळून आली होती. बडा अरब राजाने चाकणचा किल्ला बांधला. किल्ल्याच्या निर्मितीसाठी चाकण परिसरातील मंदिरांचा विध्वंस करून त्याचे अवशेष बांधकामासाठी वापरले. दोन्ही मूर्ती यापैकीच असल्याचा अंदाज इतिहास संशोधक यांनी वर्तविला आहे.
येथे एक अत्यंत जुनी महावीर मूर्ती आणि भार वाहक तसेच काही पुरातन विरगळ नव्याने आढळून आले आहेत. चाकण किल्ल्याच्या आधी किंवा दरम्यान या भागात मंदिर असावे. त्याचे दगड किल्ल्याच्या उभारणीच्या वेळी तटबंदीला लावण्यात आलेले असावेत. किल्ल्याच्या परिसरात मिळून येत असलेल्या मूर्ती आणि पुरातन वस्तू जतन करून ठेवण्यात येत आहेत.
- विलास वाहने, सहायक संचालक, पुरातत्व विभाग