

Amit Shah, S. Jayshankar Meet President
नवी दिल्ली : गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीमध्ये जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली. एकीकडे राजधानी दिल्लीत महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू असताना लष्करप्रमुख शुक्रवारी श्रीनगरला भेट देणार आहेत.
राष्ट्रपतींसोबत झालेल्या या भेटीदरम्यान अमित शाह आणि एस. जयशंकर यांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना आगामी काळात काय काय पावलं उचलावी या संदर्भातही राष्ट्रपतींशी चर्चा केली. राष्ट्रपतींनी देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी पावलं उचलण्याचे सुचवल्याचे समजते.
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी श्रीनगरला भेट देणार आहेत. या भेटीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी लष्कराचे स्थानिक अधिकारी जनरल द्विवेदी यांना माहिती देतील. पहलगाम हल्ल्यासह काश्मीर नियंत्रण रेषेवर (एलओसी) चालवल्या जाणाऱ्या दहशतवादविरोधी कारवायांची माहितीही जनरल द्विवेदी यांना दिली जाईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बुधवारी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत लाल रंगाची एक फाईल होती. गुरुवारी जेव्हा अमित शाह यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली तेव्हाही त्यांच्यासोबत ती लाल रंगाची फाईल होती. पहलगाम हल्ल्याच्या संदर्भाने ही महत्त्वाची आणि गोपनीय फाईल असल्याचे मानले जाते. या लाल फायलीमध्ये गोपनीय कागदपत्रे असून अमित शाह स्वतः ही फाईल हाताळत आहेत.