

Pahalgam Terror Attack
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. या बैठकीत पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तान आहे. हा हल्ला आपल्या लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे, असेही या बैठकीत म्हटले गेले. दरम्यान, या बैठकीत जेव्हा एकजुटीची सर्वात जास्त आवश्यकता घटक होती तेव्हा सत्ताधारी पक्ष या घटनेचा वापर भेदभावाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत काँग्रेसने भाजपवरही टीका केली.
या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने तीव्र शोक व्यक्त केला आणि तीव्र निषेध केला तसेच काँग्रेस पक्षाने शोकाकूल कुटुंबियांप्रति तीव्र संवेदना व्यक्त केल्या. या दुःखाच्या प्रसंगी पक्ष त्यांच्यासोबत पूर्ण एकजुटीने उभा आहे, असेही पक्षाने म्हटले. काँग्रेस कार्यसमितीच्या या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यसमिती मधील सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, माध्यम सरचिटणीस जयराम रमेश, प्रवक्ते पवन खेडा यांनी बैठकीत पारीत केलेल्या प्रस्तावाची माहिती दिली.
काँग्रेस कार्यसमितीत पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले. या ठरावात म्हटले की, 'हा हल्ला एक भ्याड आणि सुनियोजित रणनीती तयार करून केलेला हल्ला होता, हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच आहे. हा हल्ला म्हणजे आपल्या लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. तसेच संपूर्ण देशाच्या भावना भडकवण्यासाठी हिंदूंना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष सुरक्षेतील त्रुटी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करेल. सरकारने यावर उत्तर द्यावे अशी आमची इच्छा आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने २५ एप्रिल रोजी देशभरात मेणबत्ती मार्च काढण्याची घोषणा केली. आगामी अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे जेणेकरून यात्रेकरूंची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि पर्यटकांवर अवलंबून असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे जीवनमान सुरक्षित राहील.
काँग्रेसने म्हटले की, पहलगाम हा एक अत्यंत सुरक्षित क्षेत्र मानला जातो. जिथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट अखत्यारीत असलेल्या या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची सविस्तर आणि निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे. जनहितासाठी हे प्रश्न उपस्थित करणे महत्वाचे आहे जेणेकरून पीडित कुटुंबांना न्याय मिळताना स्पष्टपणे दिसेल.
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या चर्चेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा की घेऊ नये यावर दोन गट निर्माण झाले. एका गटाला वाटत होते की तातडीने केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली पाहिजे तर दुसऱ्या गटाला वाटत होते की आता राजीनामा मागण्यासारखी परिस्थिती नाही किंवा सामान्य परिस्थिती नाही. त्यामुळे आत्ता राजीनामा मागू नये. शेवटी यावर कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस कडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागितला जाऊ शकतो. गृहमंत्र्यांच्या राजीनामाच्या मागणीचा सरकारवरचा दबाव देखील वाढवला जाऊ शकतो.