

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री आले असताना ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेवेळी इतर विषयांसह पार्थ पवार प्रकरणी चर्चा झाल्याचे समजते.
पुण्यातील जमीन प्रकरणात पार्थ पवारांचे नाव आले. त्यानंतर काही दिवसांनी ही भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणातील खुलासा अमित शाह यांच्यासमोर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शाह याप्रकरणी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील चौकशी समितीच्या अहवालानंतर सर्व काही गोष्टी स्पष्ट होतील, असे संकेत अमित शाह यांनी यावेळी दिल्याचे समजते.
दरम्यान, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी अजित पवार दिल्ली दौऱ्यावर होते. एनडीएचा घटक पक्ष म्हणून ही सौजन्य भेट असल्याचे अजित पवार यांच्या पक्षाकडून सांगण्यात येत असले तरी राज्यातील विविध विषय आणि पुण्यातील जमीन प्रकरणात पार्थ पवारांचे नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.