एनटीए वादाच्या भोवऱ्यात, शिक्षणमंत्र्यांची मात्र, ‘क्लीन चीट’ !

एनटीए वादाच्या भोवऱ्यात, शिक्षणमंत्र्यांची मात्र, ‘क्लीन चीट’ !

[author title="उमेश कुमार" image="http://"][/author]

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशभरात ही परीक्षा लागू करण्याला तामिळनाडू सरकारने सर्वप्रथम विरोध केला होता. याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नसल्याने तामिळनाडूतही नीट परीक्षा कायम राहिली. आता पुन्हा एकदा नीट परीक्षेत कथित पेपरफुटी आणि गैरप्रकार झाल्याचे आरोप होत असल्याने राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) वादात सापडली आहे. नीट परीक्षेतील निकालात १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याच्या द्यावरून देशभरात आंदोलन सुरू असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी (दि.13) दिले आहेत. न्यायालयाने या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण रद्द झालेली गुणपत्रिका स्वीकारा अथवा फेरपरीक्षेला सामोरे जा, असे दोन्ही पर्याय दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही नीट परीक्षेवरून निर्माण झालेला गोंधळ शांत होताना दिसत नाही. या संपूर्ण प्रकरणात एनटीएच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेत पेपरफुटी आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. एनटीए ही देशातील विश्वासार्ह संस्था असल्याचे सांगून त्यांनी एनटीएला क्लिन चीट दिली आहे. शिक्षणमंत्र्यांनी एनटीएची पाठराखण केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहारमध्ये अलीकडेच एका विद्यार्थ्याला नीट परीक्षेतील गोंधळाबाबत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या विद्यार्थ्याची चौकशी केल्यावर इतरही काही लोकांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिक्षणमंत्र्यांनी नीट परीक्षेत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा केला केला तर मग या विद्यार्थ्याला कशासाठी अटक करण्यात आली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा विद्यार्थी दोषी नसतानाही पोलिसांनी त्याला अटक केली असेल तर एनटीए संस्थेने बिहार पोलिसांवर खटला दाखल करण्याची गरज आहे. मात्र, एनटीएने अशी कुठलीही हालचाल केलेली नाही.

एनटीए संशयाच्या घेऱ्यात

नीट २०२४ परीक्षेचे निकाल १४ जून रोजी जाहीर होणार असल्याचे एनटीएने आधी म्हटले होते. मात्र, या तारखेपूर्वीच ४ जूनला निकाल घोषित करण्यात आला. दहा दिवसांपूर्वीच निकाल जाहीर करण्यामागे काय गौडबंगाल आहे, याचे उत्तर विद्यार्थी, पालकांना मिळाले नाही. यासंदर्भात खुलासा करताना एनटीएने निकाल तयार झाल्यामुळे आधीच जाहीर करण्यात आल्याचे म्हटले. निकाल लवकर घोषित झाल्याने विद्यार्थ्यांचे समूपदेश आणि प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असा एनटीएचा दावा आहे.

विरोधक संसदेत गोंधळ घालणार

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. खासदारांचा शपथविधी आणि राष्ट्रपतींचे अभिभाषण पार पडल्यानंतर संसदेत चर्चेचे सत्र सुरू होईल. या चर्चेत विरोधी पक्षांकडून नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उचलून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. या मुद्यावरून विरोधक रालोआ सरकारची कोंडी करणार, हे स्पष्ट आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन आपला बचाव करताना दिसणार आहे. संसदेत जितकी जास्त वेळ नीटवर चर्चा होईल, तितका विद्यार्थी, पालकांचा असंतोष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी मुद्यावरून मोठा धक्का बसलेल्या भाजपसाठी नीट परीक्षा गोंधळाचा मुद्दा डोकेदुखी ठरणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news