नीटची कौन्सिलिंग सुरूच राहणार

नीटची कौन्सिलिंग सुरूच राहणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अनियमिततेमुळे नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेलाच धक्का बसला आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्ला यांनी मंगळवारी नोंदवले. नीट समुपदेशनावर बंदी घालण्यास मात्र खंडपीठाने नकार दिला. परीक्षेचे आयोजन करणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) न्यायालयाने नोटीसही बजावली असून त्यात विविध आरोपांबाबतचे खुलासे देण्यास सांगितले आहे. शिवांगी मिश्रा आणि अन्य नऊ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी एक जून रोजी ही याचिका दाखल केली होती.

बिहार आणि राजस्थानच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षा रद्द करून या प्रकाराची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.

…आणि ही दुसरी याचिका

नीट निकालावर बंदी घालावी म्हणून अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि डॉ. शेख रोशन यांनी 10 जून रोजी एक वेगळी याचिका दाखल केली आहे. ग्रेस गुण देण्यात मनमानी झाल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. एका परीक्षा केंद्रातील 67 उमेदवारांना 720 पैकी जवळपास संपूर्ण गुण देण्यात आलेले आहेत, यावरही याचिकेतून संशय घेण्यात आलेला आहे. 5 मे रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटला होता, असा उल्लेखही याचिकेतून आहे.

20 हजार विद्यार्थ्यांच्या तक्रारी

देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांच्या नीट-यूजी 2024 संदर्भात तक्रारी असून, त्याबाबतच्या याचिका विविध न्यायालयांतून दाखल आहेत.

ग्रेस मार्कसाठी याचिका

आठ जून रोजी राजस्थानातील तनुजा या विद्यार्थिनीनेही राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ओएमआर शीट तिला उशिरा देण्यात आले आणि लवकर परतही घेण्यात आले. असे असतानाही या कारणाने इतरांना दिले तसे तिला ग्रेस मार्क्स देण्यात आलेले नाहीत, असे तिने या याचिकेत म्हटलेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news