

Bluevine layoffs
नवी दिल्ली: हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) परिणाम म्हणावा की कंपनीची बिकट आर्थिक स्थिती, हे सांगणे कठीण आहे; परंतु एका अमेरिकन वित्तीय कंपनीने नुकतेच केवळ ५ मिनिटांच्या व्हिडिओ कॉल दरम्यान खराब कामगिरीचे कारण देत भारतीय कस्टमर सपोर्ट टीममधील सर्व ८० कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले आहे.
कामावरून काढण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, तांत्रिक कारणास्तव त्या दिवशी सर्व ८० कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले होते. त्यांना त्यांच्या संध्याकाळच्या शिफ्टच्या शेवटी ही नोकरी गेल्याची अचानक बातमी समजली.
कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये लिहिले की, "नोकरी जाण्याच्या भीतीने आम्ही सर्वजण दिवस-रात्र मेहनत करत होतो. असे असूनही कंपनीने आमच्यावर थोडीही दया दाखवली नाही. मी मंगळवारपर्यंत एका अमेरिकन बँकेसाठी कस्टमर सपोर्ट टीमचा भाग होतो. प्रशासकीय कारणांचे कारण देत त्यांनी आम्हाला घरून काम करण्यास सांगितले होते."
कर्मचाऱ्याने सांगितले की, ते त्यांची संध्याकाळी ६:३० वाजता सुरू झालेली शिफ्ट ३ तास पूर्ण करून रात्री ९:३० वाजता पोहोचले होते. याच दरम्यान वरिष्ठ व्यवस्थापनाने संपूर्ण टीमला एका व्हिडिओ कॉलवर बोलावले आणि थेट नोकरीवरून कमी केल्याचे सांगितले. फक्त ५ मिनिटांच्या या कॉलमुळे ८० कुटुंबे संकटात सापडली आहेत. या प्रकारणावर तीव्र संताप व्यक्त करत कर्मचारी म्हणाला, "अशा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करताना खूप वाईट वाटते, ज्या आपल्याला कोणत्याही क्षणी रस्त्यावर आणू शकतात. मी माझ्या नोकरीत इतकी मेहनत घेतली, याचेच आता मला वाईट वाटते."
ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर युजर्सनी या घटनेला दुर्दैवी आणि निराशाजनक म्हटले आहे. एका युजर्सने जेव्हा विचारले की इतक्या क्रूरपणे नोकरीवरून काढणारी ती कंपनी कोणती होती, तेव्हा पीडित कर्मचाऱ्याने 'ब्लूवाइन' (Bluevine) असे नाव सांगितले. 'ब्लूवाइन' हे एक डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे, जे लहान व्यवसायांसाठी ऑनलाइन बिझनेस चेकिंग खाती, पेमेंट टूल्स आणि क्रेडिट लाइन यांसारख्या सुविधा पुरवते.
कर्मचाऱ्याने सांगितले की, भारतीय टीम अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्यामुळे त्यांना काढण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे होते. यावर कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, "हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांच्या अमेरिकन टीममधील कर्मचारी सर्वात जास्त नोकऱ्या सोडतात, ते कामावर मनमानी करतात आणि क्वचितच एखादे काम व्यवस्थित करतात. याउलट, नोकरीच्या सुरक्षिततेच्या चिंतेपोटी आम्ही भारतीय कर्मचारी नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त काम करण्यासाठी तत्पर असतो."