Pahalgam Terror Attack | दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यास सर्व पक्षांचा सरकारला पाठिंबा

All Parties Ssupport Government| सुरक्षेत चूक झाल्याचे बैठकीत सरकारने केले मान्य
Pahalgam Terror Attack
संग्रहित छायाचित्र file photo
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack

नवी दिल्ली : काश्मिरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी, संसदेमध्ये जवळपास दोन तास सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची आणि त्याविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच सरकारने सर्व पक्षांचे मत जाणून घेतले. दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त कराव्या आणि पाकिस्तानवर देखील कारवाई करावी, असे विरोधी पक्षाने म्हटले. बैठकीमध्ये दु:खद घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि सर्व नेत्यांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

सर्वपक्षीय बैठकीमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरक्षा व्यवस्थेवरुन सरकारला घेरले. सुरक्षेसंबंधीत सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला केले. त्यानंतर सुरक्षेत चूक झाल्याचे केंद्र सरकारने बैठकीत मान्य केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारने बैठकीत सांगितले की, यात्रा कंपन्या आणि हॉटेलमालकांनी पर्यटकांची माहिती सरकारला दिली नाही. घटनास्थळावर पर्यटक एकत्र जमले, याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतल्याचे सरकारने बैठकीत सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारने बैठकीत चूक मान्य केल्याने विरोधी पक्षाने मवाळ भूमिका घेत सरकारच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. बैठकीत, इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सर्व खासदारांना कुठे चूक झाली आणि कोणत्या परिस्थितीत हा दहशतवादी हल्ला झाला याची माहिती दिली. जिथे हा हल्ला झाला तिथून पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात असे सांगण्यात आले.

Pahalgam Terror Attack
Pahalgam terror attack : दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवा

दहशतवादाविरोधात सर्व पक्षीय नेत्यांचा सरकारला पाठिंबा- किरेन रिजीजू

बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, बैठकीत सर्व नेत्यांनी एकमताने सांगितले की आम्ही कॅबिनेट सुरक्षा समितीच्या निर्णयाशी सहमत आहोत. सर्व नेत्यांनी सरकारतर्फे भविष्यात घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. दहशतवादाबाबत सरकारचे धोरण शून्य सहनशीलतेचे (झिरो टॉलरन्स) आहे. आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सुरक्षेतील चुकीची माहिती दिली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावले उचलली जात आहेत, असे रिजीजू म्हणाले.

विरोधी पक्षाने बैठकीत सुरक्षेसंबंधी सवाल केले

बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दहशतवादाविरोधातील कठोर कारवाईसाठी सरकारच्या सोबत असल्याचे म्हटले. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पहलमगाममध्ये सीआरपीएफ का तैनात करण्यात आले नाही? जलद प्रतिसाद पथकाला (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तास का लागला? असे सवाल ओवैसींनी केले. दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून मारले त्याचा मी निषेध करतो, असे ते म्हणाले. आप खासदार संजय सिंह म्हणाले की, संपूर्ण देश संतप्त, दुःखी आहे आणि केंद्र सरकारने दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत योग्य उत्तर द्यावे अशी देशाची इच्छा आहे. ज्या प्रकारे त्यांनी निष्पाप लोकांना मारले आहे, त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या पाहिजेत आणि पाकिस्तानवरही कारवाई केली पाहिजे. ही घटना २२ एप्रिल रोजी घडली आणि २० एप्रिल रोजी सुरक्षा यंत्रणांना माहिती नसताना ही जागा खुली करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांना याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. आम्ही मागणी केली आहे की जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि सुरक्षेत त्रुटी का होती यावर कारवाई केली पाहिजे. असे खासदार संजय सिंह म्हणाले.

Pahalgam Terror Attack
Pahalgam terror attack : जीव मुठीत धरून कुटुंबीयांसह 40 तास प्रवास

बैठकीत उपस्थित नेते

सर्वपक्षीय बैठकीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय, ‘आप’चे खासदार संजय सिंह, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गट बैठकीला अनुपस्थित, पत्र लिहून कारण कळवले

सरकारने बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनुपस्थित होते. याबद्दल दुर्गम भागात असल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, असे कारण ठाकरे गटाने दिले. आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याची संधी द्यावी तसेच आमचे म्हणणे आम्ही पत्राद्वारे कळवत आहोत. या परिस्थ्तितीत आम्ही भारत सरकार सोबत आहोत, असे ठाकरे गटाने पत्राच्या माध्यमातून सांगितले. मात्र या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला सरकारने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होण्याचा पर्याय दिला नाही.

ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी संसदीय कार्यमंत्री किरेण रिजीजू यांना पत्र लिहून सांगितले की, सर्वप्रथम पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध नागरिकांना, त्यातही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्याप्रमाणे हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो आणि ह्या काळात आम्ही भारत सरकार सोबत आहोत हे सांगू इच्छितो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news