

Pahalgam Terror Attack
बेळगाव : पहलगाममधील (जम्मू काश्मीर) बैसनर खोर्यात 30 निष्पाप पर्यटकांना अमानुषपणे ठार करुन दहशतवाद्यांनी कौर्याची परिसीमा गाठली आहे. हा देशावर केलेला हल्ला आहे. हा हल्ला करणार्या दहशतवाद्यांना योग्य धडा शिकवा, अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी बुधवारी (दि. 23) जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधानांकडे केली.
पर्यटकांवर हल्ला करणे ही बाब गंभीर आहे. देशाच्या सुरक्षिततेवरच केलेला हा हल्ला आहे. अशा घटना घडल्या तर त्याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होणार आहे. त्यामुळे, भारतीय अर्थव्यवस्थेलाही धक्का पोहोचणार असून वेळीच अशा दहशतवाद्यांचा खात्मा करणे गरजेचे आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव बार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, सरचिटणीस अॅड. वाय. के. दिवटे, अॅड. शरद मुंडरगी, अॅड. डी. एम. पाटील, अॅड. आर. पी. पाटील, अॅड. रमेश पाटील, अॅड. ऋतुराज पाटील, अॅड. सिद्धेश औरवाडकर यांच्यासह वकील उपस्थित होते.