पुणे : मी, माझी पत्नी, मुलगा यांच्यासह एकूण 22 जणांचा ग्रुप. आम्ही सर्वजण जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेलो होतो. तेथून परतण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी आम्ही थांबलो तेथून काही अंतरावर गोळीबार झाल्याचे समजले. त्यामुळे आम्हाला तेथेच थांबावे लागले. काही तासांनी पहाटेच्या सुमारास आम्ही जम्मू विमानतळाकडे निघालो. वाटेत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पहलगाम ते जम्मू असा 12 तासांचा प्रवास होता. मात्र, त्याला 40 तास लागले. भीतीच्या छायेखालील हा प्रवास अक्षरश: जीव मुठीत धरून केला...
हा प्रसंग सांगत होते पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे. अतिरेकी हल्ल्याची घटना घडल्यावर ते पर्यटकांच्या ग्रुपसह काश्मीरमध्ये होते. दै. पुढारीने त्यांच्याशी थेट फोनवर संवाद साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. विजय पारगे आपल्या शालेय मित्रपरिवार व कुटुंबियांसह काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. गुरुवारी (दि. 17) ते पुण्यातून काश्मीरकडे विमानाने निघाले. तेथे पोहचल्यावर त्यांनी श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, द लेक, टूलिफ गार्डन, पहलगाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहिली.
पारगे व त्यांचा ग्रुप ज्या ठिकाणी थांबला तेथून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर काश्मीरमध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. या प्रसंगामुळे सर्वजण भयभीत झाले. त्या वेळी त्यांना राहण्यासाठी खोलीसुद्धा मिळत नव्हती. एका मित्राच्या मदतीने त्यांना खोली मिळाली. मात्र, पुन्हा परतताना एका ठिकाणी लँड स्लाइड झाल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा पहलगामला परतावे लागले.
वाहतूक कोंडीत पारगे आणि त्यांचा ग्रुप अडकून पडला. त्यामुळे जम्मू विमानतळावरून असलेली त्यांची दोन विमाने चुकली, असे पारगे यांनी सांगितले.
पर्यटकांवर गोळीबार झाल्याने पुन्हा कोणीही तेथे पर्यटनाला जाण्याचे धाडस करेल का? पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही तरी ठोस नियोजन करणे आवश्यक होते. तसे, नियोजन आम्हाला दिसले नाही. परंतु, यापुढे शासनाने पर्यटकांच्या सुरक्षेचीही जबाबदारी घ्यायला हवी. तसेच, मी काश्मीर येथे असताना ही घटना घडल्याचे समजताच माझ्या संघटनेतील सभासदांनी, मित्रपरिवाराने व नातेवाइकांनी माझी विचारपूस केली. त्याबद्दल सर्वांचे आभार.
विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ