

Ajeet Bharti SC ST Act case : रक्षण सुधारणेबाबत भाष्य करणारे युट्युबर अजित भारती यांना दिल्ली न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (SC/ST Act) दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला.नगीना येथील खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या 'आझाद समाज पक्ष (कांशीराम)' च्या दिल्ली प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून ऑगस्ट महिन्यात दिल्लीतील नॉर्थ एव्हेन्यू पोलीस ठाण्यात भारती यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी अजित भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दखल पात्र नसल्याचा युक्तिवाद केला. "केवळ गुन्हा दाखल झाला आहे म्हणून त्यांना अटक केली जाईल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही," असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. अजित भारती यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, त्यांनी कोणतीही जातिवाचक शिवीगाळ केलेली नसून, केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्याविरुद्ध झालेल्या गंभीर चिथावणीला प्रत्युत्तर दिले होते.तथापि, अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ प्रताप सिंह यांनी भारती यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
२२ ऑगस्ट रोजी अजित भारती यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओवरून हा विवाद सुरू झाला. या व्हिडिओमध्ये त्यांनी जातिवाचक, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. भारती यांनी आझाद यांच्याविरोधात जातिवाचक शब्द वापरल्याचा आरोप फेटाळून लावला होता. हा एफआयआर दबावाखाली नोंदवण्यात आला असून "न्यायालयात दोन मिनिटेही टिकणार नाही," असा दावा त्यांनी केला होता.
युट्यूब लाईव्हदरम्यान एका युझरने टिप्पणी केली होती. यावर उत्तर देताना भारती यांनी चंद्रशेखर यांच्याबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.