

Air India flight turbulence : फुकेत (थायलंड) येथून दिल्लीला येणाऱ्या 'एअर इंडिया'च्या AI2379 या विमानाला मंगळवारी हवेत अचानक जोरदार वाऱ्याच्या दणक्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला. या दरम्यान काही काळासाठी विमानाची उंची अचानक बदलली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवले, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे दिल्लीत सुरक्षित लँडिंग झाले असून, सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
हवेत निर्माण झालेल्या या टर्ब्युलन्समुळे प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांना अशा १२ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. एअर इंडियाचे पथक आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांची योग्य काळजी घेत आहेत.
"प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता तसेच आरोग्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रभावित झालेल्या सर्वांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे. तसेच, या घटनेच्या तपासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे," असे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.