

Air India
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या तिरुवनंतपुरमहून दिल्लीला निघालेल्या विमानात संभाव्य तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. या विमानाला रविवारी चेन्नई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी हा प्रवास 'भयावह' असल्याचे सांगत, लँडिंगवेळी एकाच धावपट्टीवर दुसरे विमान असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI2455 ने रविवारी तिरुवनंतपुरम येथून दिल्लीसाठी उड्डाण केले. मात्र, मार्गातील खराब हवामान आणि विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्याने वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून विमान चेन्नईकडे वळवण्याचा निर्णय घेतला. विमान चेन्नईत सुरक्षितपणे उतरले असून, आता त्याची आवश्यक तांत्रिक तपासणी केली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. आमचे चेन्नईतील सहकारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करत असून, त्यांना लवकरात लवकर त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे."
या विमानातून प्रवास करणारे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी 'X' वरील एका पोस्टमध्ये आपला थरारक अनुभव सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "माझ्यासोबत अनेक खासदार आणि शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान AI2455 आज मोठ्या दुर्घटनेच्या अगदी जवळ पोहोचले होते. उशिराने सुरू झालेला हा प्रवास पुढे भयावह ठरला. टेक-ऑफनंतर लगेचच विमानाला हादरे बसले. सुमारे तासाभराने कॅप्टनने फ्लाईट सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे सांगत विमान चेन्नईकडे वळवले. जवळपास दोन तास आम्ही विमानतळावर लँडिंगच्या परवानगीची वाट पाहत घिरट्या घालत होतो. पहिल्या प्रयत्नात लँडिंगवेळी तर काळजाचा ठोकाच चुकला, कारण त्याच धावपट्टीवर दुसरे विमान असल्याचे सांगण्यात आले. त्या क्षणी कॅप्टनने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा वर उचलण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांचे प्राण वाचले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले. आम्ही कौशल्य आणि नशिबामुळे वाचलो."
वेणुगोपाल यांनी पुढे म्हटले की, "प्रवाशांची सुरक्षा नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. मी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची आणि अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची खात्री करण्याची विनंती करतो." या गंभीर आरोपांनंतरही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.