

Air India Express Emergency Landing : वाराणसीहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे आज (दि. ३) सकाळी लखनौच्या चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग (इमर्जन्सी लँडिंग) करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या कार्गो होल्डमध्ये धुराचा अलार्म वाजल्यामुळे वैमानिकाने सुरक्षेचा उपाय म्हणून हे विमान लखनौकडे वळवण्याचा निर्णय घेतला.
विमानात अलार्म वाजताच वैमानिकाने तत्काळ लखनौ विमानतळाशी संपर्क साधला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (ATC) परवानगी मिळाल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान जमिनीवर उतरताच आपत्कालीन प्रतिसाद पथकाने परिस्थिती हाताळली. अग्निशामक दल आणि तांत्रिक तज्ज्ञांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून विमानाची तपासणी केली.
'IX १२५३' या उड्डाणाने गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजता वाराणसी विमानतळावरून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच कार्गो होल्डमधील 'स्मोक डिटेक्शन अलार्म' वाजला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने सकाळी ८:५२ वाजता लखनौ विमानतळावर विमान उतरवले.सकाळी ९:०२ वाजेपर्यंत विमानातील सर्व १५५ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. तपासणीनंतर विमान ॲप्रनमध्ये पार्क करण्यात आले.
प्राथमिक तपासणीत विमानात धुराचे कोणतेही चिन्ह आढळून आले नाही. त्यामुळे अलार्म नेमका कशामुळे वाजला, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेवर स्पष्टीकरण देताना एअर इंडिया एक्स्प्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, वाराणसी-दिल्ली उड्डाणातील वैमानिकांनी तांत्रिक कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून विमान लखनौकडे वळवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी दुसऱ्या पर्यायी विमानाची तातडीने सोय केली जात आहे."दरम्यान, यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी गोरखपूर विमानतळावर लँडिंगदरम्यान इंडिगोच्या एका विमानाचा मागील भाग (टेल) जमिनीला धडकल्याची घटना घडली होती. त्यानंतर वैमानिकांनी विमान पुन्हा हवेत घेऊन 'एटीसी'च्या परवानगीनंतर सुरक्षित लँडिंग केले होते.