

Air India Ahmedabad Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर जाणीवपूर्वक केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
इटलीतील कोरीएरे डेला सेरा या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर असे निष्कर्ष काढले आहेत की, 12 जून 2025 रोजी झालेल्या या दुर्घटनेत विमानाच्या इंजिनचे फ्यूल कंट्रोल स्विच मुद्दाम बंद करण्यात आले होते. त्यामुळे विमानाची पॉवर अचानक गेली आणि काही सेकंदांतच ते कोसळले.
हे विमान Boeing 787 Dreamliner प्रकारचे होते. टेकऑफनंतर लगेचच ते अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. या भीषण अपघातात तब्बल 260 जणांचा मृत्यू झाला होता, तर केवळ एक प्रवासी वाचला होता. विमान ज्या इमारतीवर कोसळले, तिथे राहणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही यात समावेश होता.
भारताच्या तपास संस्थेने यापूर्वी जुलै 2025 मध्ये दिलेल्या प्राथमिक अहवालात कॉकपिटमधील शेवटच्या संभाषणाचा उल्लेख केला होता. त्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला म्हणत होता,
“तू फ्यूल बंद का केलं?”
त्यावर उत्तर येतं,
“मी नाही केलं.”
तपास यंत्रणांना आता संशय आहे की दोन्ही इंजिन बंद होण्यामागे पायलट कारणीभूत असू शकतो. विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर को-पायलट होते. काही अहवालांमध्ये कॅप्टनच्या मानसिक आरोग्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप साफ फेटाळले असून नव्याने स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
ब्लॅक बॉक्सच्या डेटावरून सुरुवातीच्या तपासात कोणताही मोठा मेकॅनिकल फॉल्ट आढळलेला नाही. उलट, फ्यूल स्विच मॅन्युअली करण्यात आल्याचा संशय आहे.
दरम्यान, अंतिम अहवालात भविष्यात पायलट्ससाठी नियमित मानसिक आरोग्य तपासणी आणि मानसशास्त्रीय चाचणी बंधनकारक करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. मात्र, भारताची नागरी विमान वाहतूक संस्थेचा Directorate General of Civil Aviation (DGCA) अंतिम रिपोर्ट येईपर्यंत कोणताही ठोस निष्कर्ष काढू नये, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.
थोडक्यात सांगायचं तर या अपघातामागे तांत्रिक बिघाड नव्हे, तर कॉकपिटमधील फ्यूल स्विच बंद केल्याची शक्यता आहे. मात्र सत्य काय आहे, हे अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.