Ayushman Bharat AI tools
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या 'आयुष्मान भारत' या आरोग्य विमा योजनेतील गैरप्रकार आणि बनावट क्लेम्सना चाप लावण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केला जाणार आहे. रुग्णालयांकडून सादर केली जाणारी बनावट बिले, बनावट वैद्यकीय कागदपत्रे आणि विमा हप्त्यांमध्ये होणारी फसवणूक शोधून काढण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन 'एआय' प्रणालींचे सादरीकरण शुक्रवारी केंद्र सरकारतर्फे करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, 'इंडिया एआय मिशन' आणि आयआयएससी बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'AB PM-JAY ऑटो-अॅडज्युडिकेशन हॅाकेथॉन २०२६' मध्ये या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत होणारी फसवणूक कमी करणे, विम्याच्या दाव्यांची प्रक्रिया वेगवान करणे आणि संपूर्ण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या हॅाकेथॉनमध्ये विविध स्टार्ट-अप्स आणि संस्थांनी सादर केलेल्या तंत्रज्ञानामध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही यंत्रणा कोणत्याही भाषेतील वैद्यकीय कागदपत्रे स्कॅन करून त्यातील डेटा अचूकपणे वेगळा करू शकते. अगदी निकृष्ट दर्जाच्या कागदपत्रांमधूनही माहिती मिळवून ती उपचार नियमावलीनुसार आहे की नाही, याची पडताळणी करेल.
रुग्णालयांनी सादर केलेले एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय अहवाल 'एआय'द्वारे तपासले जातील. यामुळे रुग्णाला खरोखर त्या आजाराचे निदान झाले होते की नाही, हे स्पष्ट होईल. डिस्चार्ज समरीमध्ये केलेली छेडछाड, बिलांमधील फेरफार आणि 'डीपफेक'च्या मदतीने तयार केलेली बनावट वैद्यकीय कागदपत्रे ओळखण्याची क्षमता या प्रणालीत आहे. योजनेचा लाभ घेणारे बनावट लाभार्थी शोधण्यासाठी विशेष मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.
"भारताने स्वतःकडील आरोग्य विषयक डेटाचा वापर करून हेल्थ 'एआय बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म' विकसित केला आहे. ग्लोबल साउथमधील असा उपक्रम राबवणारा भारत हा आघाडीचा देश ठरला आहे."
डॉ. सुनील कुमार बर्णवाल (सीईओ, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण)