

गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज दुपारी एक मोठी आणि अत्यंत दुःखद विमान दुर्घटना घडली. येथील प्रसिद्ध बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर एक विमान कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक डॉक्टर्स आणि विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास असल्याने चिंता वाढली आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालयात कार्यरत असलेल्या लातूर येथील डॉ. ऐश्वर्या बिर्ला यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल माहिती दिली. डॉ. ऐश्वर्या या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ नेत्र विभागात कार्यरत असून, दुर्घटना घडली तेव्हा त्या रुग्णालयात आपल्या कर्तव्यावर हजर होत्या. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. काही वेळातच ही दुर्घटना महाविद्यालयाच्या वसतिगृहावर झाल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. ऐश्वर्या यांनी सांगितले की, "ज्या इमारतीवर विमान कोसळले, ती आमच्या कॉलेजच्या वसतिगृहाची इमारत आहे. मी घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर होते. त्या इमारतीत बरेच डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी राहतात. दुपारची वेळ असल्याने काही जण जेवण करत होते, तर काही आराम करत होते. त्याचवेळी हा काळाने घाला घातला." सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार काही डॉक्टर्स या दुर्घटनेत दगावल्याचे समजले, मात्र अधिकृत आकडा प्रशासनाकडून येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. वसतिगृहाची इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली असून, बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
या अनपेक्षित आणि भीषण घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालय परिसर आणि रुग्णालयात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. डॉ. ऐश्वर्या म्हणाल्या, "ही बातमी समजताच मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना घरून आणि नातेवाईकांकडून सतत फोन येत आहेत. सर्वांच्या मनात एक अनामिक भीती आहे. रुग्णालय प्रशासनाने आम्हाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, गरज पडल्यास तात्काळ मदतीसाठी बोलावले जाईल."
एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, कित्येक तरुण डॉक्टरांची स्वप्ने या आगीच्या लोळात आणि धुराच्या लोटात विरून गेली. या निष्पाप जीवांचा काय दोष होता, अशा शब्दांत डॉ. ऐश्वर्या यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दुर्घटनेने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून, बचाव आणि मदत कार्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.