

Ahmedabad plane crash : अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 या विमानाचा भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या काही सेकदांमध्ये ही दुर्घटना घडली. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यामध्ये दोन वैमानिक आणि १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने ( डीजीसीए) दिली.
'डीजीसीए'च्या माहितीनुसार, लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 या विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल होते. त्यांच्यासोबत सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर हे को-पायलट होते. कॅप्टन सभरवाल यांचा विमान उड्डाणाचा ८२०० तासांचा अनुभव होता. तर सहवैमानिक कुंदर यांचा ११०० तासांचा अनुभव होता. विमानाने टेकऑफनंतर लगेचच एअर ट्रॅफिक कंट्रोल ( ATC) ला ‘Mayday’ कॉल दिला. मात्र, त्यानंतर ATC च्या कोणत्याही कॉलला प्रतिसाद दिला गेला नाही, अशी माहिती 'डीजीसीए'ने ANI च्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.
“विमानाने रनवे २३ वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानतळाच्या कुंपणाबाहेर कोसळले. अपघात स्थळावरून गडद काळा धूर निघताना दिसला,” असे DGCA च्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे. मी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व यंत्रणांना तात्काळ आणि समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी म्हटले.
मेडे कॉल म्हणजे अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत दिला जाणारा सिग्नल किंवा संदेश होय. याचा उपयोग विशेषतः वैमानिक (पायलट), नौदल अधिकारी अत्यंत संकटात असताना करतात.विमानाला गंभीर समस्या असल्यास विमानाद्वारे मेडे कॉल केला जातो. हा कॉल फक्त जिविताला धोका असेल तरच वापरावा लागतो.
गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर प्रवासी विमानांच्या सुरक्षिततेबद्दल आणि तांत्रिक त्रुटींमधील त्रुटींबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जाणून घेवूया विमान दुर्घटना होण्यामागील प्रमुख चार कारणे
तांत्रिक बिघाड
विमान अपघातांचे एक मुख्य कारण म्हणजे तांत्रिक बिघाड. विमानाचे इंजिन बिघाड, नेव्हिगेशन सिस्टममध्ये बिघाड किंवा लँडिंग गियर किंवा पंखांमध्ये समस्या आहे, ज्यामुळे विमान कोसळू शकते.
मानवी चूक
विमान अपघाताचे तांत्रिक बिघाडांबरोबरच मानवी चुकांमुळेही होवू शकते. यामध्ये अनुभवाअभावी वैमानिकाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे अनेक वेळा विमान अपघात होतो.
तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या चुका
अनेकवेळा विमानात चुकीचे इंधन भरणे, टायर प्रेशरचे निरीक्षण करण्यात चुका किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या चुका यामुळेही विमान अपघाताची शक्यता खूप वाढते.पायलट आणि नियंत्रण कक्षामधील संपर्क तुटल्यामुळेही विमान अपघात होऊ शकतो.
हवामानाचाही परिणाम
विमान अपघातात हवामान देखील महत्त्वाची भूमिका बजावते. खराब हवामानात जोरदार वादळ, वीज, मुसळधार पाऊस आणि अशांतता यामुळे विमान नियंत्रणाबाहेर जाते यामुळेही विमान दुर्घटना घडतात.