

Ahmedabad Air India Plane Crash Hits Medical Hostel
अहमदाबाद : अहमदाबादमधील विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून घटनेची तीव्रता आता समोर येत आहे. एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेल परिसरात कोसळले असून या अपघातात शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. इमारतीमध्ये आग लागल्यानंतर काही जणांनी खिडकीतून खाली उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यातील एका विद्यार्थ्याच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे रमिला यांनी सांगितले.
अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळले. निवासी भागात हे विमान कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून विमान ज्या भागात कोसळले तो भाग बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिकाऊ डॉक्टरांचा हॉस्टेलचा परिसर आहे.
अपघाताचे वृत्त समजताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. रमिला यांचा मुलगाही त्या वैदयकीय महाविद्यालयात शिकतो. त्या म्हणाल्या, गुरुवारी दुपारी माझा मुलगा जेवणासाठी हॉस्टेल बिल्डिंगमध्ये गेला होता. तेवढ्यात तिथे विमान कोसळल्याने इमारतीला आग लागली. आग वेगाने पसरत असल्याने माझा मुलगा घाबरला आणि त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने त्याचं किरकोळ दुखापतीवर निभावलं. सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला रुग्णालयाच्या आतमध्ये जाऊ दिले जात नाहीये. त्याला प्रत्यक्ष बघितल्यावरच दुखापतीचा अंदाज येईल. माझं फोनवर त्याच्याशी बोलणं झालंय, असं रमिया यांनी सांगितले.
विमान अपघातात इमारतीची अवस्था काय झालीये पहा
बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमानाचा काही भाग हॉस्टेलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला धडकला. यात इमारतीचे भीषण नुकसान झाले असून इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे का या वृत्ताबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.
चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या
गुजरातमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्टेलमध्ये शिकाऊ डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. अपगात घडला त्यावेळी इमारतीमध्ये किमान 50 जण होते. अपघातानंतर इमारतीला आग लागली. भीती पोटी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार हॉस्टेलमधील खिडकीतून एकाने त्याच्या लहान मुलाला खाली फेकले. तर एका महिलेनेही खाली उडी मारली. चौथ्या मजल्यावरून किमान आठ जणांनी उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींने स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.