नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली, यामध्ये राज्यातील परिस्थितीसह जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, राज्यात आमचे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध श्वेतपत्रिका काढणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दिल्ली दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज आम्ही पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली, राज्यातील काही माहिती त्यांना दिली. राज्यातील आघाडीबाबतही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. कमिशन घणाऱ्या लोकांचे हे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह अनेक प्रकल्पांमध्ये कोट्यावधी रुपये कोणी खाल्ले याची चौकशी करण्याची गरज आहे, आमते सरकार आल्यानंतर आम्ही या सर्व प्रकरणांची श्वेतपत्रिका काढू, असेही ते म्हणाले. केंद्रीय कृषिमंत्री तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाऊन पॅकेज जाहीर करतात मग महाराष्ट्रात नुकसान झाले तेव्हा महाराष्ट्राला पॅकेज का जाहीर करत नाही, महाराष्ट्राबाबत दुजाभाव का, असा सवालही त्यांनी विचारला.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार दिल्ली दौऱ्यावर होते. विरोधी पक्षनेते हे पद राजशिष्टाचारात येते. विरोधी पक्षनेते या नात्याने त्यांना महाराष्ट्र सदन प्रशासनाने शासकीय गाडी पाठवणे आवश्यक होते. मात्र त्यांना भाड्याने घेतलेली गाडी पाठवण्यात आली. त्यामुळे राजशिष्टाचाराअंतर्गत येत असलेल्या विरोधी पक्षनेते पदावरील नेत्याला भाड्याच्या गाडीने प्रवास करावा लागला. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान न्यायाधीशांचा नियोजित दौरा आहे, त्या दौऱ्यामध्ये गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांसाठी गाडी देता आली नाही, आणि म्हणून भाड्याची गाडी देण्यात आल्याचे महाराष्ट्र सदन प्रशासनाने सांगितले. मात्र विरोधी पक्ष नेत्यांना अशी वागणूक दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून मुख्यमंत्री आले असते तर त्यांनाही महाराष्ट्र सदन प्रशासनाने अशीच भाड्याची गाडी पाठवली असती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.