चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलत नसल्यामुळे राज्यात महिला, तरूणी, बालिका सुरक्षित राहिलेल्या नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील बसस्थानकावर एका गतीमंद महिलेवर अत्याचार करून समाजमाध्यमांमध्ये व्हिडीओ शेअर केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना (शुक्रवार) समोर आली. यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली.
काल शुक्रवारी नागभिड येथील बसस्थानकावरील प्रसाधनगृहात मध्यरात्रीच्या सुमारास एका मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. नागभिड पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पीडित महिलेची ओळख् पटवून आरोपींचा शोध घेतला. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पाच आरोपींना नागभिड पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेची माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली.
महाराष्ट्रात एकामागून एक अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. परंतु राज्य सरकार अत्याचाराची प्रकरणे रोखण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचा आरोप करीत कायदा सुव्यवस्थेचे राज्यात धिंडवडे निघाल्याचा गंभीर आरोप केला. कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसविण्यात आल्याने राज्यात महिला, तरूणी, बालिका सुरक्षित नाहीत. महिलांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.