

Rakesh Kishore On CJI Gavai :
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न केलेल्या निलंबित वकील राकेश किशोर यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मला या कृत्याबाबत कोणताही पश्चाताप नाही असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ते एएनआयशी बोलताना म्हणाले, 'मला दुःख झालं होतं. मी कोणत्याही नशेत नव्हतो. ही माझी त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया होती. जे काही झालं त्याचा मला पश्चाताप नाहीये.'
सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) सकाळी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बीआर गवई हे सुनावणी घेत असताना अचानक राकेश किशोर यांनी सनातन धर्माचा अपमान सह करणार नाही अशी घोषणा देत सरन्यायाधिशांच्या दिशेनं बुट फेकण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, न्यायमूर्तींनी याचा निषेध केला. मात्र गवई यांनी या प्रकरणाला फारसं महत्व न देता. आपलं दैनंदिन कामकाज सुरूच ठेवलं.
दरम्यान, वकील राकेश किशोर यांना निलंबित करण्यात आलं. मात्र सन्यायाधीश यांनी त्यांच्याविरूद्ध कोणतीही तक्रार न केल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. आज त्यांनी एएनआयशी बोलताना आपण ही कृती का केली याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
राकेश किशोर म्हणाले, 'एक पाआयएल १६ सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांच्या कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी सरन्याधीश यांनी चेष्टा करत जा आणि देवासमोर प्रार्थना करा की तुमचं शिर तुम्हीच पुन:प्रस्थापित करा असं वक्तव्य केलं होतं.'
किशोर पुढे म्हणाले, 'ज्यावेळी नुपूर शर्माचं प्रकरण कोर्टासमोर येतं त्यावेळी कोर्ट म्हणतं की तिनं वातावरण दुषित केलं. ज्यावेळी सनातन धर्माचा विषय येतो त्यावेळी सर्वोच्च न्यायालय अशा प्रकराचे आदेश देतं. याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला जात नाही. उलट ते त्यांची चेष्टा करतात.'
'यामुळं मी खूप दु:खी झालो होतो. मी कोणताही नशा केला नव्हता. ही माझी त्यांच्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती. मला कोणालाही घाबरत नाही. जे काही झालं त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही.'
किशोर यांना तुमच्या या कृतीमुळं भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू शकतात याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी, 'न्यायमूर्तींनी संवेदनशीलतेनं वागलं पाहिजे. लाखो केसेस पेंडिंग आहेत. मी कोणाचीही माफी मागणार नाही का मला कोणताही पश्चाताप झालेला नाही. तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं मी काहीही केलेलं नाही. ही परमात्माची इच्छा होती मी केलं. त्याची जर इच्छा असेल तर मी जेलमध्ये जाईन, मला फाशी होईल किंवा मला मारलं जाईल. ही परमात्माची इच्छा असेल.'