

Prabodhankar Thackeray Book :
मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी रूग्णालयातील आपल्या सर्व सहकाऱ्यांनी सेंड ऑफच्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाटलं होतं. त्यावरूनच रूग्णालयात मोठा वाद झाला. एका महिला कर्मचाऱ्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाटण्यावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते प्रबोधनकार ठाकरेंनी या पुस्ताकडून हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलं आहे.
दरम्यान, संबधित महिला ही रूग्णालयातील माजी कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांच्याशी यााबबत वाद घालतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रतिक पाटील यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करून प्रतिक पाटील म्हणतात, 'व्हॉट्सॲप विद्यापीठातून भरलेला द्वेष आता बाहेर येतोय. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी परवा सेवानिवृत्त होत असताना सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तके वाटले तर एका बाईला राग आला आणि ते पुस्तके कदमांच्या तोंडावर फेकून मारले.'
मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम सेवानिवृत्तीनंतर आपल्यासोबत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट म्हणून दिले होते. त्यावर त्यांनी आपलं नाव देखील लिहिलं होतं. मात्र त्यांच्या एका महिला सहकाऱ्यांना हे आवडलं नाही. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तकच का वाटलं म्हणून कदम यांना विचारणा केली.
महिला व्हिडिओमध्ये म्हणतात, 'हे पुस्तक वाटण्याचा उद्येश काय? यावर कदम यांनी उत्तर दिलं की देण्याचा उद्येश हा आहे की हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे. त्यावर त्या महिला म्हणतात की, ते काहीही असू दे ते राहिले बाजूला. तुम्ही तुमच्या हातानं वाटण्याचं काय कारण आहे.' त्यावर कदम यांनी उत्तर दिलं की मला जे योग्य वाटलं ते वाटलं.'
वाद वाढणार असं लक्षात आल्यावर कदम म्हणाले, 'हे पाहा मी याच्यावर जास्त काही बोलणार नाही. जर तुम्हाला आवडलं नसेल तर ते तुम्ही मला परत द्या.' यावर चिडलेली महिला म्हणाली की याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून गिफ्ट देताय. रिटन काय आम्ही हातपण लावणार नाही या पुस्तकाला.... त्या महिला कदम यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. त्या तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं का वाईट वाटतं.
यावर कदम यांनी आपली बाजू स्पष्ट करत मला काही वाईट वाटत नाही. ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यांनी हे पुराव्यानिशी लिहिलं आहे. मात्र महिला कदम यांनी हे पुस्तक त्यांनाच का दिलं यावरून वाद घालत राहिल्या. त्या म्हणाल्या मी जर भगवतगीतेचं पुस्तक वाटलं तर तुम्ही घेणार का. त्यावर कदम यांनी हो घेणार ना.... असं उत्तर दिलं.
मात्र महिला म्हणाल्या की तरी पण मी हे पुस्तक घेणार नाही. भगवतगीतेत चांगले सुविचार आहेत. यामध्ये हिंदू धर्माबद्दल सगळं वाईट लिहिलं आहे. यावर कदम यांनी तुम्हाला वाटतं ना मी माफी मागावी तर मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो.
त्यावर महिला म्हणते की तुम्हाला जर हिंदू धर्माबद्दल एवढं हे आहे ना तर तुम्ही हिंदू धर्मवाल्या मुलींकडून सेंड ऑफ घेऊ पण नका, यानंतर त्या महिलेनं प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं पुस्तक कदम यांच्याकडे भिरकावलं.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यावरून एका वेगळ्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.