नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापवणारे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणातील एका आरोपीने न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपीच्या याचिकेनंतर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरोपी अरूण पिल्लई यांनी ईडीला दिलेले बयाण मागे घेण्याची विनंती करीत ही याचिका दाखल केली आहे. ईडीकडून बळजबरीने बयाण घेण्यात आल्याचा आरोप याचिकेतून त्यांनी केला आहे. या प्रकरणात राऊज एवेन्यू न्यायालयाने ईडीला नोटीस बजावले असून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी, १३ मार्चला याप्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल. मद्य धोरणातील घोटाळ्याशी संबंधित असल्याचा आरोप करीत ईडीने सोमवारी पिल्लई यांना सोमवारी अटक केली होती. १३ मार्चपर्यंत ते ईडीच्या कोठडीत आहेत. पिल्लई यांच्यावर १०० कोटींची लाच आम आदमी पार्टी पर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप आहे.
पिल्लई यांना चौकशीनंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. ते रॉबिन डिस्टिलरीज एलएलपी नावाच्या कंपनीत भागीदार आहेत. ही कंपनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता तसेच त्यांच्याशी संबंधी समुहाचे प्रतिनिधित्व करते, असा ईडीचा दावा आहे.