

Abhijeet Dipke CJP protest Jantar Mantar: अमेरिकेतून ‘जय भीम’चा नारा देत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके भारतासाठी रवाना झाले आहेत. शनिवारी सकाळी ते दिल्लीत पोहोचणार असून, त्यानंतर जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन उभारण्याचा त्यांचा मानस आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले आहे.
भारतासाठी रवाना होताना अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. “भारतासाठी निघालो आहे. माझे भविष्य मी संविधानाच्या हाती सोपवत आहे. जय भीम,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली असून, दिल्लीतील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिपके यांनी भारतात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम दिल्लीतील पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे सांगितले आहे. जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मागण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून कोणतीही परवानगी मिळालेली नसली तरी त्यांनी आपल्या समर्थकांना आणि पक्षाच्या नोंदणीकृत सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा दावा दिपके यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हजारो लोक दिल्लीत जमणार असल्याचे सांगितले. तसेच, पक्षाचे 11 लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कॉकरोच जनता पार्टी आणि तिच्या नेत्यांच्या मते, हे आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आहे. नीट (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरण आणि सीबीएसईच्या निकाल प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात सोशल मीडियावरील एका उपरोधिक मोहिमेतून झाली होती. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भातून ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव चर्चेत आले. सुरुवातीला विनोद म्हणून सुरू झालेल्या या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच या पेजचे फॉलोअर्स प्रमुख राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाले आहेत.
आता ही ऑनलाइन चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न सुरू असून, अभिजीत दिपके यांच्या दिल्ली दौऱ्याकडे आणि प्रस्तावित आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि प्रशासनाची भूमिका काय राहते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.