

Who Is Rajesh Mehta: एकेकाळी अवघ्या 1,200 रुपयांच्या भांडवलातून व्यवसाय सुरू करणारे राजेश मेहता आज भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या उद्योगपतींपैकी एक ठरले आहेत. मात्र यावेळी त्यांची चर्चा यशामुळे नव्हे, तर गंभीर आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे होत आहे.
बाजार नियामक सेबीने (SEBI) राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश मेहता यांच्याविरोधात अंतरिम आदेश जारी केला आहे. कंपनीने आर्थिक माहिती चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा, प्रमोटर-संबंधित संस्थांमार्फत निधीचा गैरवापर केल्याचा आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप सेबीने केला आहे.
सेबीच्या प्राथमिक तपासानुसार, आर्थिक वर्ष 2021 ते 2025 दरम्यान कंपनीने तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले. मात्र यापैकी जवळपास 99.8 टक्के महसूल फुगवून दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपांमुळे भारतीय उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
20 जून 1964 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या राजेश मेहता यांनी लहान वयातच वडिलांच्या दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल टाकले. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी आणि त्यांचे भाऊ प्रशांत मेहता यांनी मोठ्या भावाकडून 1,200 रुपये उधार घेऊन चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला.
त्या काळात भारतातील दागिन्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात असंघटित होता. मात्र मेहता बंधूंनी वेगाने व्यवसाय वाढवत दक्षिण भारतासह गुजरात आणि मुंबईसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये मजबूत नेटवर्क उभे केले.
1995 मध्ये राजेश एक्सपोर्ट्सने शेअर बाजारात प्रवेश करत आयपीओद्वारे 10 कोटी रुपये उभारले. त्यानंतर कंपनीने व्यवसायाचा विस्तार केला. सोन्याचे शुद्धीकरण, दागिने निर्मिती आणि किरकोळ विक्री अशा सर्व क्षेत्रांत कंपनीने विस्तार केला.
2015 मध्ये कंपनीने स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध रिफायनरी ‘व्हॅलकांबी’ (Valcambi) तब्बल 400 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतली. या व्यवहारामुळे राजेश एक्सपोर्ट्सला जागतिक बाजारपेठेत मोठी ओळख मिळाली. कंपनीचा दावा आहे की ती जगातील सुमारे 35 टक्के सोन्यावर प्रक्रिया करते.
सेबीच्या अहवालानुसार, कंपनीच्या परदेशी उपकंपन्यांनी दाखवलेला महसूल मोठ्या प्रमाणात संशयास्पद आहे. 97 ते 99 टक्के महसूल स्वतंत्रपणे पडताळता आलेला नाही. परदेशातील व्यवहारांच्या नावाखाली महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासादरम्यान अहमदाबादमधील एका छोट्या ब्रोकिंग कंपनीचे नावही समोर आले. कंपनीने हजारो कोटी रुपयांचे व्यवहार दाखवले असले तरी जीएसटी नोंदींमध्ये त्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. संबंधित ब्रोकिंग कंपनीनेही अशा व्यवहारांना नकार दिला आहे.
सेबीचा आरोप आहे की कंपनीने बनावट लेखा नोंदींचा वापर करून उलाढाल कृत्रिमरीत्या वाढवली आणि काही व्यवहारांचा उपयोग वैयक्तिक डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमधील तोटा लपवण्यासाठी केला गेला.
सेबीच्या कारवाईनंतर राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. याचा परिणाम एलआयसीवरही झाला. कारण कंपनीत एलआयसीची सुमारे 10.80 टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
राजेश एक्सपोर्ट्सने सेबीचे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिलेली आर्थिक माहिती पूर्णपणे अचूक आहे. सेबीकडून ‘EBITDA’ आणि महसूल यामध्ये गोंधळ झाल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या सेबीने राजेश मेहता यांना कंपनीच्या सिक्युरिटीजमध्ये खरेदी-विक्री किंवा व्यवहार करण्यास मनाई केली आहे. तसेच कंपनीच्या खात्यांचे आणि व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
एकेकाळी छोट्या भांडवलातून सुवर्ण साम्राज्य उभारणारे राजेश मेहता आता त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. सेबीच्या अंतिम तपासानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.