Solar Storm Airbus: भारतातील ए३२० विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड कधीपर्यंत पूर्ण होणार? DGCA चं उत्तर
नवी दिल्ली: जगभरातील ए३२० विमानांना उड्डाण नियंत्रणाच्या महत्त्वाच्या डेटावर परिणाम करणाऱ्या तीव्र सौर किरणोत्सर्गाच्या संभाव्य समस्येचे निराकरण करण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेडची आवश्यकता असल्याचा अलर्ट एअरबसने शुक्रवारी जारी केला.
यामध्ये भारतातील ३३८ विमानांचा समावेश आहे. त्यानुसार भारतातील विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करणे सुरू आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए)च्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण प्रभावित विमानांपैकी अर्ध्याहून अधिक विमानांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत डीजीसीएकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण ३३८ विमानांपैकी १८९ ए३२० विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड पूर्ण झाले आहे. तर सर्व प्रभावित विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड ३० नोव्हेंबर रोजी, सकाळी ५:२९ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे.
कोणतेही उड्डाण रद्द झाले नाही
सूत्रांनी सांगितले की, उड्डाण नियंत्रणाशी संबंधित समस्येमुळे कोणतेही उड्डाण रद्द झालेले नाही. मात्र, प्रभावित विमानांसाठी सॉफ्टवेअर अपडेट केले जात असल्याने काही विमानांच्या उड्डाणांसाठी ६०-९० मिनिटांचा विलंब होत आहे. दरम्यान, शुक्रवारी, एअरबसने सांगितले होते की, तीव्र सौर किरणोत्सर्गामुळे ए३२० विमानांच्या उड्डाण नियंत्रणांसाठीचा महत्त्वाचा डेटा खराब होऊ शकतो.
त्यामुळे समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर बदलांमुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, भारतात इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान वाहतूक कंपन्यांकडे ए३२० विमाने आहेत.

