नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील डाळिंब तसेच आंब्यांची लवकरच अमेरिकेत निर्यात केली जाणार आहे ( pomegranate and mango export ). जानेवारी-फेब्रुवारी २०२२ पासुन ही निर्यात सुरू होईल. तर, डाळिंबांच्या दाण्याची निर्यात एप्रिल २०२२ पासुन सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने शनिवारी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाच्या (टीपीएफ) बैठकीच्या पार्श्वभूमीवर, भारताचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांनी परस्परांकडे कृषी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळण्यासंबंधी अंमलबजावणीच्या आराखडा करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ( pomegranate and mango export )
करारानुसार भारतीय आंबे, डाळिंबांना तसेच डाळिंबाच्या दाण्यांना परीक्षणपश्चात बाजारपेठ प्रवेश दिला जाईल. तर, अमेरिकेची चेरी आणि अल्फाल्फा गवताला भारतात प्रवेश मिळेल.
अमेरिकेतून चेरी, अल्फाल्फा गवताची निर्यात एप्रिल २०२२ पासून सुरू होईल. मंत्रीस्तरीय चर्चांच्या आधारे, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागानेही अमेरिकी डुकराच्या मांसाला बाजारप्रवेश देण्याची तयारी दर्शवली आहे. याला अंतिम स्वरूप देण्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता विषयक अंतिम प्रमाणपत्राची स्वाक्षऱ्या झालेली प्रत दाखल करण्याची विनंती विभागाकडून करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.