Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत हजारपेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण | पुढारी

Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत हजारपेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून या लाटेत आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त डॉक्टरांना घातक विषाणूची लागण झाली आहे. दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेतही डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे मागील काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. (Third Wave)

आतापर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, चंडीगड, लखनौ, पटियाला आदी शहरात डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये डॉक्टर्स संक्रमित होत आहेत. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या रुग्णालयांतील 260 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. गुरुवारी सायन रुग्णालयातील 30 निवासी डॉक्टर्सना कोरोनाची बाधा झाली होती. पंजाबमधील चंदीगड पीजीआय रुग्णालयातील परिस्थिती बिघडली असून गत दोन दिवसांत येथे 196 डॉक्टर्स आणि कर्मचारी बाधित झाले आहेत.

झारखंड राज्यात अशीच स्थिती असून रांचीच्या रिम्स रुग्णालयात बुधवारी विक्रमी प्रमाणात 179 कोरोनाबाधित डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी सापडले. याशिवाय रिम्समध्ये पंधराशे लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या, त्यातील 245 लोकांना कोरोना झाल्याचे दिसून आले होते. दिल्लीमध्ये अलीकडेच एम्स हॉस्पिटलमधील 50 डॉक्टरांना संक्रमण झाले होते. तर सफदरगंज रुग्णालयात 26 डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. (Third Wave)

आरएमएल रुग्णालयात 38 डॉक्टर्ससह 45 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तर हिंदुराव रुग्णालयातील 20 डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बिहारमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. येथील पाटणास्थित एनएमसीएम मंगळवारी 59 डॉक्टरांना कोरोना झाला होता. या रुग्णालयातील बाधित डॉक्टरांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. कोलकाता येथील एनआरएस रुग्णालयात 70 डॉक्टर्स आणि परिचारिकांना कोरोना झाला आहे. शहरातील अन्य रुग्णालयातही कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथेदेखील परिस्थिती फार वेगळी नाही.

पहा व्हिडीओ : मोराने दोस्ती शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही

Back to top button