सेमी कंडक्टर उत्पादनास प्रोत्साहन | पुढारी

सेमी कंडक्टर उत्पादनास प्रोत्साहन

सेमी कंडक्टर उत्पादक कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत. हा विविध उत्पादनांमधील एक मूलभूत घटक आहे. भारताचे आकर्षण या कंपन्यांना असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, चीनबद्दल सध्या असलेले अनिश्‍चिततेचे वातावरण होय.

भारत सरकार चिप उत्पादन उद्योगासाठी संपूर्ण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने काम करीत आहे आणि प्रोत्साहन योजनेअंतर्गत उद्योग उभारणीसाठी अर्ज मागविले जाणार आहेत. येत्या दोन-तीन वर्षांत उत्पादनही सुरू होईल, असा विश्‍वास केंद्रीय तंत्रज्ञानमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी व्यक्‍त केला आहे. सेमी कंडक्टर म्हणजे चिप हा जवळजवळ सर्वच उद्योगांसाठी मूलभूत आवश्यक घटक आहे. रेल्वे, जहाज आदींसह सर्व वाहने असोत, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणे असोत किंवा वैद्यकीय उपकरणे असोत, सर्वत्र सेमी कंडक्टरचा वापर केला जातो. कोणत्याही डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूची कल्पनाही सेमी कंडक्टरशिवाय करता येत नाही. सेमी कंडक्टर उत्पादन उद्योगात तैवान, चीन, युरोप आणि अमेरिकेतील डझनभर बड्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. या कंपन्यांची बहुतांश उत्पादन केंद्रे तैवान आणि चीनमध्येही आहेत. त्यांना ‘फॅब्रिकेशन युनिट’ असे म्हणतात.

अशा युनिटस्ची स्थापना करण्यासाठी अत्याधुनिक आणि जटिल यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. अत्यंत स्वच्छ परिस्थितीत सेमी कंडक्टरच्या गुणवत्तेकडे आणि उत्पादनाकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे असते. कारण, चिपमध्ये कोणत्याही स्वरूपात धुळीचे कण गेल्यास चिप निरुपयोगी ठरू शकते. अशा स्थितीत हे संयंत्र उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. यासाठीचे आवश्यक कौशल्यही कमी लोकांकडे आहे. उच्च दर्जाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने उत्पादन संलग्‍न प्रोत्साहन योजना (पीएलआय स्कीम) ही एक प्रमुख योजना बनविली. यात सेमी कंडक्टर (अर्धसंवाहक) या उत्पादनाचाही समावेश आहे. त्यासाठी 76 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. सेमी कंडक्टरचा चीनमधून होणारा पुरवठा विविध कारणास्तव खंडित झाला आहे, याची जाणीव आपल्याला आहे. त्याचवेळी काही भू-राजकीय समस्यादेखील चीनशी निगडित आहेत. चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढला आहे. चीनमध्ये चिप्स बनविणार्‍या तैवानच्या कंपन्यांना काही वर्षांपासून भीती होती की, गंभीर तणावात त्यांच्या संयंत्रांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. ते संयंत्र उभारणीसाठी पर्यायी देशांचाही शोध घेत आहेत. हे सर्व घटक एकत्रितपणे सक्रिय असल्यामुळेच भारताच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला वेग आला आहे.

सेमी कंडक्टर उत्पादक कंपन्यांसाठी भारत महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि विकासाबरोबरच या बाजारपेठेचा आकारही वाढणार आहे, हे त्यांना ठाऊक आहे. विविध उत्पादनांमधील हा एक मूलभूत घटक आहे. भारताचे आकर्षण या कंपन्यांना असण्याचे आणखी एक कारण म्हणजे चीनबद्दल सध्या असलेले अनिश्‍चिततेचे वातावरण होय. चीनमध्ये अधिक उत्पादन संयंत्रे असतील, तर पुरवठ्यावरही परिणाम होईल आणि व्यवसायही कमकुवत होईल, असा विचार करणे सध्याच्या भू-राजकीय वातावरणात कंपन्यांना भाग पडले आहे. म्हणूनच ते अशा देशांच्या शोधात आहेत, जिथे कारखाने उभारून संकटाचा सामना करता येऊ शकेल. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, भारत सरकारची धोरणे आणि योजना. पीएलआय योजना आणि इतर योजनांद्वारे सेमी कंडक्टर उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जात आहेत.

सेमी कंडक्टरचे देशांतर्गत उत्पादन सुरू झाल्यास सर्वच उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगारासोबतच नवता, संशोधन आणि प्रशिक्षणालाही प्रोत्साहन मिळेल. येत्या काही वर्षांत सेमी कंडक्टरच्या जागतिक बाजारपेठेेतील किमान दहा टक्के हिस्सा भारताकडे असेल. चिप उत्पादक कंपन्यांना केवळ मोठी बाजारपेठच मिळेल असे नाही, तर या कंपन्या इतर देशांना विशेषतः आग्‍नेय आशियातील आणि आफ्रिकेतील देशांमध्ये सेमी कंडक्टरची निर्यातही करू शकतील. भू-राजकीय परिणामांव्यतिरिक्‍त चिनी सरकारची मूळ समस्या अशी आहे की, ते देशांतर्गत कंपन्यांना चालना देण्यासाठी सेमी कंडक्टरचा पुरवठा अडवून धरतात. भारत आणि तैवानमध्ये झालेला सहकार्य करार महत्त्वाचा आहे. भारत सरकारने योग्य वेळी देशातील उच्च स्तरावरील उत्पादनाला चालना देण्यासाठीचे धोरण स्वीकारून कंपन्यांना प्रोत्साहन दिले आहे.

– अभिजित कुलकर्णी

Back to top button