समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली | पुढारी

समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली

मुंबई, पुढारी ऑनलाईन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर वादात सापडलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ येत्या ३१ डिसेंबर रोजी संपलेला होता. त्यामुळे आता केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली करण्यात आलेली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास एनसीबीकडे आल्यानंतर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबईतील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणत धडक कारवाई सुरू केली.

वानखेडे यांना ऑगस्ट २०२१ पर्यंत संचालकपदी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एनसीबीने मुदतवाढीचा आदेश काढत वानखेडे यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत चार महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. मात्र क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर वानखेडे आरोपांच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.

एनसीबी आणि मुंबई पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून आरोपांची चौकशी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाही वानखेडेंकडून ड्रग्ज तस्करांवर कारवाई सुरू आहे. परंतु, आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडे यांची बदली ही केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात करण्यात आली आहे.

Back to top button