BlackBerry OS Phones ने अखेर मोजली शेवटची घटका?; कॉल, मेसेजही पाठवता येणार नाहीत! | पुढारी

BlackBerry OS Phones ने अखेर मोजली शेवटची घटका?; कॉल, मेसेजही पाठवता येणार नाहीत!

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज जगातील सर्वांधिक लोकप्रिय स्मार्टफोन कोणता? असं जर विचारलं तर iPhone चे नाव घेतले जाते. पण तुम्हाला माहित असेल की सुमारे एक दशकापूर्वी आयफोन नाही तर एका दुसऱ्या फोनने मार्केटमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले होते. तो म्हणजे ब्लॅकबेरी (BlackBerry). पण मार्केटमध्ये नवनवीन स्मार्टफोन आल्यानंतर ब्लॅकबेरीचे आकर्षण कमी झाले. आता लोक iPhone किंवा Android हँडसेट वापरत आहेत. परंतु तरीही, काही लोक अजूनही ब्लॅकबेरी फोन वापरत असल्याने, ब्लॅकबेरीच्या कॅनेडियन कंपनीने म्हटले आहे की, पुढील आठवड्यापासून त्याची डिव्हाईसेस सेल्युलर आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीवर सपोर्ट देऊ शकणार नाहीत. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ग्राहक आणि भागीदारांना “धन्यवाद” म्हणत सेवा देण्यासाठी मुदत वाढवली होती. आता ही सेवा थांबवणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

४ जानेवारीपासून, BlackBerry 7.1 OS आणि त्याआधीच्या BlackBerry 10 सॉफ्टवेअर, BlackBerry PlayBook OS 2.1 आणि पूर्वीच्या व्हर्सन्सवर (versions) आधारित डिव्हाईसेस यापुढे कार्यान्वित राहू शकणार नाहीत, असे कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर अपडेट केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे.

याचा अर्थ असा की सेल्युलर अथवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीवरील ब्लॅकबेरी फोन डेटा अॅक्सेस, फोन कॉल्स, टेक्स्ट मेसेजिस पाठवण्यास आणि अगदी आपत्कालीन वेळी 911 (emergency 911) डायल करण्यासाठी सेवा देऊ शकणार नाहीत.
ब्लॅकबेरी कंपनीने याआधी मार्केटमध्ये आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न केला होता. 2013 मध्ये त्यांनी अँड्रॉइड आणि iOS युजर्संना आकर्षित करण्यासाठी BlackBerry 10 ला जुन्या BlackBerry OS च्या बदल्यात मार्केटमध्ये आणले.

कंपनीने शेवटी 2015 मध्ये अँड्रॉइडकडे मोर्चा वळवला आणि Apple आणि Samsung चा सामना करण्यासाठी त्यांनी नवीन स्लायडर फोन म्हणून BlackBerry Priv आणला. पण, त्यांना त्यात यश मिळाले नाही. त्याचे ब्रँड नाव कायम राहावे यासाठी 2016 मध्ये, BlackBerry ने आंतरराष्ट्रीय बाजारात TCL कम्युनिकेशन आणि भारतातील Optiemus Infracom या परवानाधारक भागीदारांना सोबत घेतले. ब्लॅकबेरीच्या भागीदारांनी BlackBerry KeyOne आणि Key2 असे मॉडेल सादर केले. पण, TCL ने फेब्रुवारी 2020 मध्ये जाहीर केले की, ते यापुढे ब्लॅकबेरी फोनचे उत्पादन करणार नाहीत.

BlackBerry Key2 LE लाँच केल्यानंतर कंपनीच्या इतर ब्रँड परवानाधारकांनीदेखील ऑक्टोबर 2018 पासून काही हालचाली केल्या नाहीत. हा ब्लॅकबेरी ब्रँड अंतर्गत बाजारात आणलेला शेवटचा फोन होता. २०२० मध्ये टेक्सास येथील OnwardMobility स्टार्टअपने २०२१ मध्ये 5G BlackBerry phone आणण्याची घोषणा केली होती. पण अद्याप हा फोन बाजारात आलेला नाही.

ब्लॅकबेरी फोनने सेवा थांबविल्याचा अर्थ असा नाही की ब्लॅकबेरी ब्रँड पूर्णपणे संपलेला आहे. ही कंपनी सध्या जगभरातील विविध सरकारांसाठी सुरक्षा सॉफ्टवेअर सेवा विकसित करण्याच्या कामात गुंतली आहे.

ब्लॅकबेरीने कंपनी म्हणून गेल्या आठवड्यात तिसर्‍या तिमाहीत वॉल स्ट्रीटच्या अंदाजांना मागे टाकत 74 दशलक्ष डॉलर (अंदाजे 551 कोटी रुपये) निव्वळ नफा मिळवला. एका वर्षापूर्वी 130 दशलक्ष डॉलर (अंदाजे 970 कोटी रुपये) तोट्याच्या तुलनेत हा नफा लक्षणीय होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

Back to top button