Bipin Rawat : कोल्हापूर ही वीरभूमी : बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा | पुढारी

Bipin Rawat : कोल्हापूर ही वीरभूमी : बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर ही वीरभूमी आहे, ज्या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्‍ती सैन्यदलात आहे अशा जिल्ह्यातील सैनिक टाकळी गावचा मला अभिमान आहे, असे गौरवोद‍्गार तत्कालीन लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) यांनी काढले होते. 109 मराठा लाईट इन्फंट्री टी. ए. बटालियनचा रोमांचकारी इतिहास असून, या बटालियनला सैन्यात मानाचे स्थान असल्याचे रावत यांनी सांगितले होते.

टी. ए. बटालियनच्या 109 मराठा लाईट इन्फंट्री (टी.ए) च्या वतीने कोल्हापुरात आयोजित माजी सैनिकांच्या महारॅलीस उपस्थित राहण्यासाठी दि. 31 नोव्हेंबर 2018 रोजी रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह कोल्हापुरात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

या कार्यक्रमास शाहू महाराज, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, खा. संभाजीराजे, मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्‍नू प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापुरात प्रथमच आलेल्या बिपीन रावत यांनी कोल्हापूरविषयी आपल्याला विशेष प्रेम असल्याचे तेव्हा माध्यमांशी बोलताना सांगितले. देशातील अनेक राज्यांत व गावांमध्ये आपण फिरत असतो; पण कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी या गावाचा अभिमान असल्याचे सांगत रावत म्हणाले, या गावातील अशी अनेक घरे आहेत यातील कोणीतरी सैन्यात आहे किंवा होते. यामुळे ही वीरभूमी आहे आणि अशा वीरभूमीत येणे हे माझे भाग्य आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीचे काम सैन्यासाठी आदर्शवत आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारी ही बटालियन आहे. शत्रूलाही भीती वाटावी, असा या बटालियनचा दरारा आहे. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तैनात केले तरी ही बटालियन विजयी होऊनच परतणार एवढी क्षमता असणारी ही बटालियन आहे. मराठा बटालियनच्या जवानांपुढे शत्रूचाही थरकाप उडतो, असे त्यांनी म्हटले होते.

तुम्ही कुठे राहता? (Bipin Rawat)

कोल्हापुरात पत्नी मधुलिका रावत यांच्यासोबत माजी सैनिकांच्या महारॅलीत सहभागी होण्यासाठी बिपीन रावत आले होते. या कार्यक्रमात वीरपत्नी, वीरमाता यांच्याशी हितगुज करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली होती. प्रत्येक वीरमातेला तुमचे नाव काय, तुम्ही कोणत्या गावातून आला, तुम्हाला ज्या सुविधा देण्यात येतात त्या मिळतात का? तुम्ही खूश आहात का, अशी विचारणा करत माजी सैनिक व त्यांच्या परिवाराशी अपुलकीचे नाते निर्माण केले. आपल्या पदाचा कोणताही गर्व न बाळगता रावत यांच्या आपलेपणाचे माजी सैनिकांनीही कौतुक केले.

Back to top button