ईव्हीएमविषयी देशभरातून आठ उमेदवारांची तक्रार दाखल

ईव्हीएमविषयी देशभरातून आठ उमेदवारांची तक्रार दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी देशभरातून 8 उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे, वादग्रस्त ठरलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाने कुठलेही अपील केले नाही.
सुजय विखे यांनी एकूण 40 बूथवरील ईव्हीएम मशीनविरोधात अपील केले आहे. त्यामध्ये शेवगाव येथील 5 बूथ, राहुरी 5, पारनेर 5, अहमदनगर शहर 5 तर श्रीगोंदयामधील 10 आणि कर्जत जामखेडमधील 5 बुथचा समावेश आहे.

एका ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी 40 हजार शुल्क

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या अथवा तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारांना शंका असलेल्या बूथवरील ईव्हीएम पुन्हा तपासण्यासाठी दाद मागता येते. यासाठी एका ईव्हीएम मशीनसाठी ४० हजार एवढे शुल्क निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे. उमेदवाराने दाद मागितल्यानंतर जर एखाद्या ईव्हीएममध्ये मतांचा फरक आढळल्यास संबंधित उमेदवाराला भरलेली रक्कम परत केली जाते. मात्र, मतांमध्ये फरक दिसला नाही तर ईव्हीएम निहाय दाखल केलेली रक्कम जप्त केली जाते.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची तक्रार नाही

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात वादग्रस्त निकाल हा मुंबईमधील उत्तर पश्चिम मतदारसंघाचा होता. सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाची अमोल कीर्तिकर विजयी दाखवण्यात आले. त्यानंतर फेरमतमोजणीत केवळ ४८ मतांनी शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. या निकालावरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निकालावर शिवसेना ठाकरे गटाकडून दाद मागण्यात आलेली नाही.

देशभरातून 8 उमेदवारांची तक्रार

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, तमिळनाडू तेलंगणा या राज्यांमधील प्रत्येकी एका लोकसभा मतदारसंघातून अपील दाखल करण्यात आले. आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातून हे अपील दाखल करण्यात आले आहे. एकूण 8 अपील दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांकडून दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news