पाटण्यात जळालेले पेपर तर गोध्रात रोकड, पण तरीही एनटीएची पाठराखण !

NEET scam
NEET scam
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे बिहार आणि गुजरातच्या पोलिसांनी केलेल्या तपासातून उघड झाले आहे. गोध्रा येथे विद्यार्थ्यांनी एजंटला मोठी रक्कम देऊन फुटलेले पेपर खरेदी केले होते. तसेच एका शिक्षकाच्या मोटारीतून 7 लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. पाटण्यात फुटलेल्या प्रश्नपत्रिका जाळण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. मात्र, तरीही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटी झाल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगून राष्ट्रीय चाचणी संस्थेची (एनटीए) पाठराखण केल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमधील असंतोष वाढत चालला आहे.

गुजरातच्या गोध्रा येथील जय जलाराम शाळेतील केंद्रावर (दि.5 मे) रोजी नीट परीक्षा सुरू होती. त्यावेळी पंचमहालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी तुषार भट्ट नावाच्या केंद्र संचालक शिक्षकाला ताब्यात घेतले होते. या शिक्षकाच्या मोटारीतून पोलिसांनी 7 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. पेपर फोडणाऱ्या दलालांनी त्याच्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका बाहेर आणल्या होत्या. या दलालांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 10 लाख रूपये घेतल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.

बिहारमध्ये पोलिसांनी पाटणा येथे नीट परीक्षेआधी एका ठिकाणी छापा टाकला होता. त्या घटनास्थळी जळालेल्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. जळालेल्या प्रश्नपत्रिकांचे तुकडे पोलिसांनी गोळा करुन आर्थिक गुन्हे शाखेने मूळ प्रश्नपत्रिकेशी त्याची जुळवाजुळव सुरू केली. पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी हे तुकडे पाठविले आहेत. या तपासातून नीटचे पेपर खरेच फुटले होते काय, याचा उलगडा होणार आहे.

निव्वळ पेपरफुटीचाच मुद्दा नाही तर 1563 विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस गुणांच्या मुद्यावरून सुद्धा वादळ उठले आहे. काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याने त्यांना ग्रेस गुण देण्यात आल्याचा राष्ट्रीय चाचणी संस्थेचा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र, तरीही नीट परीक्षेतील गोंधळ शमलेला नाही. पेपर फुटीसह नीट परीक्षेतील संपूर्ण सावळागोंधळ उजेडात येऊनही शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान पेपरफुटीचे कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचा दावा करून राष्ट्रीय चाचणी संस्थेची पाठराखण करीत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमधील असंतोष वाढत चालला आहे. या संपूर्ण प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करून नीट परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे.

परीक्षेत असा घडलाय गैरप्रकार ?

कोणत्याही प्रवेश किंवा निवड परीक्षेत भ्रष्टाचार वेगवेगळ्या प्रकारचा असतो. यामध्ये दलालांच्या सहाय्याने अगोदरच पेपर फुटी करणे, स्कॉलर विद्यार्थ्यांना रीतसर बसवणे, इत्यादी प्रकार घडतात. नीट परीक्षेच्या गोंधळामध्येही दलाल, पेपर फुटी, इत्यादी प्रकार झाले असल्याचे दावे केले जात आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news